कल्याण, जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत ग्रामपंचायत मालमत्तांचे सर्वेक्षण, नोंदणी व संगणकीकरणाच्या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या स्थावर व जंगम मालमत्तांची एकूण ९ हजार ४७७ नोंदी ऑनलाइन प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात येणार आहेत.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी सांगितले की, "ग्रामपंचायतीकडील इमारती, त्याभोवतालची मोकळी जागा, खुली भूखंड, इमारतीविना असलेल्या जमिनी आणि जंगम मालमत्तांचे सर्वेक्षण करून ऑनलाईन मालमत्ता नोंद प्रणाली ( https://zpthanemalmattakosh.com ) तयार करण्यात आली आहे. सध्या माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू आहे." या माध्यमातून प्रत्येक मालमत्तेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. हे संकेतस्थळ ग्रामपंचायतींसाठी संपत्ती व्यवस्थापनाचे पारदर्शक व युनिक साधन ठरणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले "मालमत्तांची अचूक माहिती ही स्थानिक प्रशासनाच्या पारदर्शकतेची गुरुकिल्ली आहे. या उपक्रमामुळे ग्रामस्थ, ग्रामपंचायती आणि प्रशासन यांच्यात समन्वय व पारदर्शक कार्यपद्धती निर्माण होईल. ही डिजिटल प्रणाली केवळ मालमत्ता नोंदीसाठीच नव्हे, तर मालमत्तेचे संरक्षण, नियोजन, सुविधा उपलब्धता, देखभाल आणि उत्पन्न वाढ यासाठीसुद्धा अत्यंत प्रभावी ठरणार आहे. ‘डिजिटल ग्रामशासन’ या संकल्पनेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असून, ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम व पारदर्शक बनविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल.’" असे सांगितले.