विखारविमर्श

22 Jun 2025 22:46:25

कलेसाठी जीवन की, जीवनासाठी कला’ हा वाद तसा फार जुनाच. कला समीक्षकांनी, विचारवंतांनी यावर बरेच विचारमंथन करून ठेवले आहे. रूढार्थाने या वादाचे अंतिम उत्तर काही सांगता येत नाही परंतु, एक गोष्ट मात्र नक्की; कला हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माणसाच्या जीवनाला अर्थ येतोच, तो त्याच्यावर झालेल्या कलेच्या संस्कारांमुळे. परंतु, याच कलेची, कलाकृतीची विटंबना व्हायला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा ती समाजमनाच्या अध:पतनाचीसुद्धा सुरुवातच असते. पाबलो पिकासो हे नाव विसाव्या शतकातील काही मोजयाच परंतु, आशयसंपन्न चित्रकारांपैकी एक. चित्रकलेतील आधुनिकतावादाचा विचार करायचा झाल्यास, पिकासो यांची चित्रं आजसुद्धा अनेकांसाठी मार्गदर्शक ठरतात. याच पाबलो पिकासो यांच्या ‘ल’हेटायर’ या चित्रावर, एका तथाकथित पर्यावरणवादी व्यक्तीने गुलाबी रंग उडवून, सदर चित्र विद्रुप करून टाकले आहे. २१ वर्षीय मारसेल ज्याने हे चित्र विद्रुप केले, त्याला कॅनडा पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर कारवाईचा बडगाही उगारण्यात आला. स्वतःला पर्यावरणवादी म्हणवणार्याकडून पहिल्यांदाच असे कृत्य झाले असे नाही. मागच्या पाच वर्षांपासून जगभरातील विकसित देश, विशेषता युरोपीय राष्ट्रांच्या संग्रहालयात याच गोष्टी सुरू आहेत.

एखाद्या वस्तुसंग्रहालयात जाऊन तिथल्या एखाद्या प्रसिद्ध चित्रावर अन्नाचे पदार्थ, शाई आदी गोष्टी टाकायच्या आणि ते चित्र विद्रुप करायचे. चित्र विद्रुप करून झाल्यानंतर, आपोआपच तिथल्या लोकांचे लक्ष्य वेधले जाते. अशा वेळी पर्यावरण वाचवा, नैसर्गिक संसाधनांचे शोषण थांबवा, अशा आशयाची भाषणे द्यायची. जोवर सुरक्षारक्षक येऊन या लोकांना ‘सन्मानाने’ बाहेर काढून पोलिसांच्या हवाली देत नाहीत, तोवर यांचे बोलणे सुरूच. मागील पाच वर्षांत अशी विखारी कृत्ये करणार्या काही संघटना, या तथाकथित प्रगत देशांमध्ये जन्माला आल्या आहेत. लंडनमधील ‘नॅशनल गॅलरी’मध्ये दोनदा, तर ‘रॉयल अॅकेडमी’मध्ये एकदा हा प्रकार घडला. असे कृत्य केल्यानंतर समाजमाध्यमांवर या लोकांना आणि यांच्या संघटनांना प्रसिद्धी तर मिळतेच, त्याचबरोबर पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे टाकले, याचे समाधानही.

अलीकडच्या काळात पर्यावरणावरचे (दांभिक) प्रेम दाखवणार्या अनेक संघटना प्रगत तसेच, प्रगतिशील राष्ट्रांमध्ये उदयाला आल्या आहेत. सार्वजनिक जीवनामध्ये, लोकमर्यादेचा भंग करणे, लोकांचे लक्ष वेधून घेणे, समाजमाध्यमांवर पुरेशी चमकोगिरी करून फॅनफॉलोविंग वाढून घेणे, हा प्रकार आपल्याला सर्रास बघायला मिळतो. सार्वजनिक जीवनात शिस्तभंग करणे आणि नियमांचे उल्लंघन करणे हे कृत्य निंदनीय तर आहेच परंतु, याही पलीकडे चित्रांचे विद्रोपीकरण केल्यामुळे कधीही न भरून येणारे नुकसान होत आहे. ही चित्रे म्हणजे त्या त्या देशातील लोकांचा, लोक संस्कृतीचा वारसा आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये जेव्हा युद्धाचे बिगुल वाजले, तेव्हा तिथल्या अनेकांनी प्रसंगी जीव मुठीत धरून वस्तुसंग्रहालयातील गोष्टी वाचवण्यास प्राधान्य दिले. एकीकडे ही परिस्थिती असताना, ज्या चित्रकारांची चित्रं बघण्यासाठी वेगवेगळ्या देशांमधून लोकं या मोठ्या वस्तुसंग्रहालयात गर्दी करतात, तिथे त्यांच्या दृष्टीस अशी विद्रूप चित्र पडणे हे लेशदायकच. अती अद्ययावत जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रगत राष्ट्र आणि या राष्ट्रांमधील बहुराष्ट्रीय कंपन्या, नैसर्गिक संसाधनांचे सर्वाधिक शोषण करीत असतात. अशावेळी उपभोग घेतल्यानंतर पर्यावरण वादाचा घेतलेला झेंडा म्हणजे दुटप्पीपणा आहे, हे वेगळे सांगणे न लागे.

वरवर पाहता काही निवडक संघटनांचे हे समाजविघातक कृत्य, आपल्याला दिसते परंतु, याच्या तळाशी असलेले राजकारण आणि सातत्याने अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न यातून त्या त्या राष्ट्रामध्ये समाजविघातक शक्ती कशा कार्यरत असतात, याचे आकलन होणे गरजेचे आहे. लोकशाही प्रबळ असलेल्या अनेक राष्ट्रांमध्ये अशा प्रकारच्या अनेक चळवळी फोफावतात, जिथे अगदी त्या त्या राष्ट्राच्या अस्मितेविरोधात गरळ ओकणारे लोक अनेकांसाठी मसीहा होतात. मात्र, अशा आंदोलनातून नेमके काय निष्पन्न होते, खरोखरच त्या त्या देशांमधील गरिबी दूर होते का? लोकांचे जीवनमान सुधारते का? या प्रश्नांची उत्तरे काही मिळत नाही. अशा ‘आंदोलन’जीवी लोकांनी व त्यांच्या संघटनांनी सुरू केलेला विखारविमर्श ओळखणे, ही काळाची गरज आहे.
Powered By Sangraha 9.0