अहिल्यानगर : सरकारी नोकऱ्या मिळवताना आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या आणि त्यानंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारून हिंदू रितिरिवाज मोडीत काढणाऱ्या नोकरदारांचा शोध घेऊन त्यांना नोकरीतून तात्काळ बडतर्फ करा, अशी लक्षवेधी येत्या अधिवेशनात मांडणार असल्याचे भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे.
सासरच्या मंडळींकडून धर्मांतर करण्यासाठी टाकण्यात आलेल्या दबावाला कंटाळून सांगलीतील ऋतूजा राजगे या ७ महिन्यांच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ रविवार, २२ जून रोजी अहिल्यानगरमध्ये 'शक्ती ऋतुजा' मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा डहाळे तसेच सर्व सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, "शक्ती ऋतुजाच्या नावाने निघालेला हिंदू आक्रोश मोर्चा हा केवळ मोर्चा नाही तर तो हिंदू समाजाचा संताप आहे. ऋतुजा राजगे यांना न्याय मिळावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी हिंदू बांधव रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रात ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून पद्धतशीररीत्या गरीब, अशिक्षित आणि संकटग्रस्त हिंदू जनतेच्या भावनाना साद घालून आमिषे दाखवून धर्मपरिवर्तनाचा घातक खेळ सुरू आहे. यामध्ये गरीबांना पैसे, महिलांना मदतीच्या नावाखाली फसवणूक आणि तरुणांना फसव्या शिक्षण-सुविधांची झुंडी दाखवून फसवले जाते. पण आज हिंदू समाज ठामपणे सांगतोय बस झालं, आता पुरे."
"आमचं मौन म्हणजे भीती नव्हती, ती मर्यादा होती, आता ती संपली आहे. धर्मांतराच्या प्रत्येक घटनेला आता निर्णायक उत्तर दिले जाईल. हिंदू धर्म, संस्कृती आणि अस्मितेवर जो कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करेल, त्याला हिंदू समाज थेट भिडणार," असा इशाराही त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, "येत्या अधिवेशनात मी लक्षवेधी मांडणार आहे. सरकारी नोकऱ्या मिळवताना आरक्षणाचा लाभ घेतला. मात्र, नोकरी मिळाल्यानंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारून हिंदू रितिरिवाज, परंपरा बाजूला सारल्या, मोडीत काढल्या आहेत. अशा नोकरदारांचा शोध घेऊन त्यांची चौकशी करून त्यांना नोकरीतून तात्काळ बडतर्फ करा. हा लढा केवळ निषेधाचा नाही तर आत्मसन्मान, अस्तित्व आणि हिंदू अस्मितेच्या रक्षणाचा आहे," असेही ते म्हणाले.