मुंबई : उबाठा गटाची अवस्था धोकादायक आणि जीर्ण झालेली आहे, असा घणाघात मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे. रविवार, २२ जून रोजी उबाठा गटाचे चांदिवली माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेट्ये यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "उबाठा गटाची मुंबईतील अवस्था ही धोकादायक आणि जीर्ण झालेली आहे. मुंबईकरांच्या विरोधी तसेच हिंदूत्व आणि बाळासाहेबांच्या विरोधी भूमिका घेतल्याने ते धोकादायक आहेत. तर त्यांच्या जहाजात कुणी राहू पाहत नसल्याने उबाठा गटाची जीर्ण अवस्था झाली आहे. उबाठा सेनेतील ५० नगरसेवक आमच्या मित्रपक्षासोबत आधीच गेले आहेत. मुंबई, मुंबईकर, मराठी माणूस, मुंबईचा विकास आणि देशहित यासोबत आम्ही एक टक्काही प्रतारणा करण्याचा मुद्दा नाही. देव, देश आणि धर्म या कार्यपद्धतीने आम्ही काम करत आहो," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "आम्ही स्वप्नांवर अजूनही जीएसटी लावलेली नाही. त्यामुळे ज्यांना स्वप्न बघायचे आहेत त्यांना बघू द्या. झोपेत स्वप्न बघणाऱ्यांना आम्ही जीएसटी माफ करू. त्यांनी नक्कीच स्वप्न बघावे. आम्ही कुणालाही संपवायला, अपमानित करायला किंवा कुणाला नष्ट करायला राजकारणात आलेलो नाही. स्वत:च्या पक्षातील कार्यकर्ते, समर्थक आणि उरलेसुरले नेते आणि मतदार टिकत नसल्यामुळे ते टिकवण्यासाठी सहानुभूती तयार करण्यासाठी उद्धव ठाकरेंची ही वाक्य आहेत. स्वत:बद्दल आणि पक्षाबद्दलची जीर्णावस्था रोखली जावी म्हणून त्यांनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे," असेही ते म्हणाले.