कल्याण : निरोगी शरीर आणि स्वस्थ मनाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून देणाऱ्या योग म्हणजेच योगाभ्यासानिमित्त संपूर्ण जगभरात 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचे निमित्त साधून भारतीय जनता पक्षातर्फे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पाचही मंडलांमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे भाजपच्या या मंडलांमध्ये झालेल्या 30 हून अधिक कार्यक्रमांमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. १७७ देशांच्या पाठिंब्यामुळे ही संकल्पना मंजूर झाली आणि २१ जून २०१५ पासून जगभरात सर्वत्र हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली प्राचीन आणि अमूल्य देणगी असून शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी तो अत्यंत प्रभावी साधन आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा जुने कल्याण मंडल अध्यक्ष अमित धाक्रस, भाजप जुने कल्याण मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार, भाजप नवीन कल्याण मंडल अध्यक्ष स्वप्निल काठे, भाजप मोहने टिटवाळा मंडल अध्यक्ष नवनाथ पाटील, भाजप टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तीवान भोईर व माजी उपमहापौर उपेक्षा भोईर तसेच भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा यांच्या माध्यमातून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध योगासने केली. भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित या सर्व योग प्रात्यक्षिक कार्यक्रमांमध्ये कल्याणातील पतंजली योग समितीच्या प्रतिनिधींनी योगशिक्षक म्हणून भूमिका बजावली. तसेच भाजप मध्य कल्याण मंडल, भाजप मोहने मंडल, भाजप टिटवाळा मंडल, योग कुटीर संस्था, सना फिटनेस योगा क्लासेस आणि विवेकानंद योग अनुसंधानच्या डॉ. ममता मिश्रा यांच्या माध्यमातूनही योग दिनानिमित्त योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. यापैकी विवेकानंद योग अनुसंधानच्या योग शिबिरालाही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उपस्थिती दर्शवली.
आजच्या धकाधकीच्या जीवनात योग हे एक अत्यावश्यक साधन बनले आहे. योगाचे नियमित सराव केल्यास आरोग्य सुधारते आणि जीवन अधिक शांत आणि समतोल होते. निरोगी जीवनासाठी आपण सर्वांनी दररोज काही वेळ योगासाठी द्यायला हवा असे आवाहन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी केले. तसेच आजच्या जागतिक योग दिनानिमित्त त्यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छाही दिल्या.