इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक वेतन सुधारणा

21 Jun 2025 20:40:27

मुंबई
:अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ (युनियन) आणि एजीआयएलइ व्यवस्थापन यांच्यात झालेल्या ऐतिहासिक वेतन सुधारणा करारामध्ये इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी सर्वात मोठी वेतनवाढ निश्चित करण्यात आली आहे. या करारामुळे सर्व एजीआयएलइ कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळून दरवर्षी एकूण १२० कोटींचा वाढीव प्रभाव होणार आहे अशी माहिती अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस सुहास माटे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.

माटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष व अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर कर्मचा-यांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचा-यांना केंद्र शासनाच्या वेतनमानानुसार वेतनरचना लागू करण्यात आली आहे. एप्रिल २०२५ पासून सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या वेतन संरचनेनुसार वेतन दिले जाणार आहे. यामध्ये कोणत्याही पद किंवा सेवाकाळाचा भेद न ठेवता सर्वांना समान लाभ मिळणार आहे.

त्याचप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना दर सहामाहीला वाढणारा महागाई भत्ता यापुढे केंद्र शासनाच्या महागाई भत्त्याचा लाभ मिळणार असून तो वेतनवाढीव्यतिरिक्त असेल. पूर्वी केवळ काही निवडक कर्मचाऱ्यांनाच राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार महागाई भत्ता मिळत होता. युनियनने ही विसंगती दूर करत सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या महागाई भत्ताचा लाभ मिळवून दिला आहे.

हे स्पष्ट करताना माटे यांनी सांगितले की, अशिक्षित कर्मचाऱ्यांसाठी रु.५००, उच्च कुशल कर्मचाऱ्यांसाठी रु. ८०० वार्षिक प्रभाव रु. २१००० ते ११६०० पर्यंत महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. तसेच विरोधी युनियनने गेल्या वर्षी केवळ ६० लाखांची वेतनवाढ मिळवली होती, तर यंदा आमच्या कर्मचारी महासंघाने तब्बल ११.५ कोटींची वाढ यशस्वीरित्या निश्चित केली आहे. विरोधी युनियनने आतापर्यंत कर्मचा-यांवर केलेल्या अन्यायाचे निराकरण आमच्या कर्मचारी महासंघाने केला आहे. कर्मचा-यासांठी परदर्शक आणि न्याय वेतनरचनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे, त्यानुसार ५ वर्षे सेवा असलेल्या ८०४ कर्मचा-यांना रु.४ हजारची अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे, तर ३ वर्षे सेवा असलेल्या १४९५ कर्मचा-यांना रु. ५३०० ते रु. ५५०० ची वाढ देण्यात आली आहे. ३ ते ५ वर्षे सेवा असलेल्या ६९३ कर्मचा-यांना रु. २५०० ते रु. ३००० ची वाढ देण्यात आली असून यामध्ये तीन श्रेणींच्या कर्मचा-यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या एतिहासिक कराराला प्रादेशिक कामगार आयुक्तांनी अधिकृत मान्यता दिली असून हा आजवरचा सर्वात मोठा वेतन करार असल्याचे माटे यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0