नवी दिल्ली : (Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली.
"ऑपरेशन सिंधू सुरूच आहे"
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्स पोस्ट करत याबाबतची माहिती देताना म्हटले आहे की, "ऑपरेशन सिंधू सुरूच आहे. २१ जून रोजी तुर्कमेनिस्तानमधील अश्गाबात येथून एक विशेष विमान सकाळी ३ वाजता नवी दिल्लीत दाखल झाले, ज्यात इराणमधील भारतीयांना घरी आणण्यात आले. यासह, ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक घरी परतले आहेत."
११० भारतीय विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीला, ज्यात ९० काश्मीरचे होते, उत्तर इराणमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि त्यांना नवी दिल्लीला विमानाने नेण्यापूर्वी आर्मेनियाला नेण्यात आले. हे विद्यार्थी प्रामुख्याने उर्मिया मेडिकल युनिव्हर्सिटीचे होते. यानंतर इराणच्या मशहाद येथून २९० भारतीय नागरिकांना चार्टर विमानाने बाहेर काढले, ज्यात विद्यार्थी आणि धार्मिक यात्रेकरूंचा समावेश होता. हे विमान २० जून रोजी रात्री ११.३० वाजता नवी दिल्लीत पोहोचले आणि सचिव अरुण चॅटर्जी यांनी त्यांचे स्वागत केले.
'ऑपरेशन सिंधू'द्वारे इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शनिवारी २१ जूनला तिसरे विमान भारतीय नागरिकांसह स्वदेशी परतले आहे. परतलेल्या विद्यार्थ्यांपैकी बरेचजण जम्मू-काश्मीरमधील असल्याचे सांगितले जाते. या मोहिमेमुळे संपूर्ण भारतातील कुटुंबांना दिलासा मिळत आहे, केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयित प्रयत्नांमुळे या प्रदेशात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे सुरक्षित परतणे सुनिश्चित केले जात आहे.