नवी दिली : भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ‘ऑपरेशन सिंधू’ सुरु केले असून या अंतर्गत इराणमधून भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणले जात आहे. यासोबतच श्रीलंका आणि नेपाळच्या नगरिकांनाही विमानेने मायदेशी परत आणण्यात येणार आहे.
इराण-इस्रायल संघर्ष वाढला आहे. त्यामुळे तेथे राहणाऱ्या परदेशातील लोकांना धोका निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने, भारताने इराणमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यास सुरुवात केली आहे. इराणमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी वास्तव्यास आहेत. त्यापैकी १८ जून रोजी ११० भारतीय विद्यार्थ्यांना आर्मेनियातून सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले.
शनिवार, २१ जून रोजी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, "आतापर्यंत ऑपरेशन सिंधू अंतर्गत ५१७ भारतीय नागरिक इराणमधून भारतात परतले आहेत. शनिवारी तुर्कमेनिस्तानच्या अश्गाबात येथून इराणमधून भारतीयांना घेऊन जाणारे एक विशेष विमान नवी दिल्लीत दाखल झाले आहे. सर्व नागरिक सुखरूपरित्या मायदेशी परतले."
श्रीलंका आणि नेपाळच्या नागरिकांचे काय?
तेहरानमधील भारतीय दूतावास श्रीलंका आणि नेपाळी नागरीकांना देखील इराण मधून मायदेशी परतण्यास मदत करणार आहे. इराणमधील श्रीलंकेच्या नागरिकांना टेलिग्रामद्वारे किंवा एक्स पोस्टवर शेअर केलेल्या आपत्कालीन क्रमांकांवर भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा अशी सूचना देण्यात आली आहे. भारताने दिलेल्या या मदतीच्या हातामुळे श्रीलंका आणि नेपाळी राष्ट्रीयत्व असलेल्या नगरिकांना दिलासा मिळाला आहे.
अनेक परदेशी विद्यार्थ्यांनी मिसाइल पडताना किंवा स्फोट होतानाचे दृश्य पाहिले. याविषयी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हा काळ त्यांच्यासाठी अतिशय खडतर होता. दरम्यान, परदेशी विद्यार्थ्यांनी भारत सरकारचे आभार मानले आहे.