सलग दोन भूकंपाचे धक्के! इराणची अणुचाचणी की इस्त्रायलचा हल्ला?

21 Jun 2025 16:03:34

तेहरान : (Iran) इराण आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेला संघर्ष सध्या शिगेला पोहोचला आहे. त्यातच इराणच्या उत्तरेकडील भागात शुक्रवारी २० जूनला रात्री सलग दोन भूकंपाचे धक्के जाणवल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या भूकंपाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या इस्त्रायल इराणच्या अणु केंद्रांवर हल्ले करत असल्याने, हे भूकंप इस्रायली हल्ल्यांमुळे किंवा इराणच्या अणुचाचण्यांमुळे झाले असावेत, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

इराण आणि इस्त्रायल यांच्यात भीषण युद्ध सुरू असताना, इराणमध्ये शुक्रवारी २० जूनला रात्री ८ वाजून ४९ मिनिटांनी सलग दोन भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. काही मिनिटांच्या आतच दुसरा धक्का बसला, ज्याची तीव्रता ४.७ इतकी होती. सैमनान शहराच्या आग्नेय दिशेने ७८ किलोमीटर अंतरावर हा भूकंप नोंदवण्यात आला. युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटर (EMSC), जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) आणि सिटिझन सिस्मोग्राफ नेटवर्क रास्पबेरीशेक यांनीही भूकंपाची पुष्टी केली आहे.

इराणच्या अधिकाऱ्यांनीही या भूकंपाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सैमनान आणि महदीशहर सारख्या भागात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र यामध्ये कोणच्याही प्रकारची हानी झालेली नाही. दरम्यान भूकंपाची तीव्रता जास्त नसली तरी स्थानिकांना सतर्क राहण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे आता या युध्दाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या हल्ल्यांमुळे स्फोट होऊन हे हादरे बसले की इराणच्या अणुचाचण्यांमुळे हादरे बसले किंवा खरोखरच नैसर्गिकपणे हा भूकंप झाला याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.



Powered By Sangraha 9.0