योगाचे परदेशस्थ शिलेदार!

21 Jun 2025 11:41:08
 
 
 
भारतीय संस्कृती आणि भारतीय विचारदर्शनाचे वेगळेपण म्हणजे जीवनाकडे बघण्याचा समग्र दृष्टिकोन. मूलभूत प्रश्नांच्या माध्यमातून मानवी जीवनातील अनेक अनुत्तरित प्रश्नांचा शोध या प्रक्रियेतून सुरू असतो. या समग्रतेचा विचार करताना मनात येणारा पहिला विचार म्हणजे योग. योग याचा अर्थ केवळ विशिष्ट व्यायामाची पद्धत असा होत नाही. कारण, योगाबद्दल बोलताना आपण ‘योगसाधना’ असा शब्दप्रयोग करतो. योग ही एक जीवनशैली आहे, म्हणूनच हे तत्त्वज्ञान शाश्वत आहे. चिरकाळ टिकणारे आहे. भारताने जगाला संस्कृतीचा जो सगुण संपन्न वारसा दिला, त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे ही योगसाधना. याच योगसाधनेचा जगाच्या पाठीवर प्रचार-प्रसार झाला. अनेक भारतीय योगप्रशिक्षक परदेशातील नागरिकांपर्यंत हा विचार पोहोचवू लागले. मागची 11 वर्षे आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतोय, हा प्रवास लक्षात घेता, या योगप्रशिक्षकांचे अनुभवसंचितसुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. आजच्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’निमित्ताने परदेशात योगप्रशिक्षणाच्या अनुभवाविषयी योगाचे परदेशस्थ शिलेदार जतिन आव्हाड आणि संदीप भापकर यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचीत...
 
इंडोनेशियातही योगासाधनेला उस्फुर्त प्रतिसाद
 
पुण्यातील ‘ज्ञानप्रबोधिनी’मध्ये एके काळी शारीरिक कसरतीचे धडे गिरवणारे जतिन आव्हाड आज इंडोनेशियामध्ये लोकांना योग शिकवत आहेत. शाळेत असल्यापासूनच जतिन यांचा ओढा क्रीडाक्षेत्राकडे होता, मैदानी खेळ त्यांना केवळ आवडायचेच असे नाही, तर तो त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला होता. ज्या गोष्टीकडे आपला कल असतो, ती गोष्ट शिकण्यासाठी, त्यातील विविधता आत्मसात करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची व जीवनामध्ये अनुशासनाचा अवलंब करण्याचीही तितकीच गरज असते. जतिन आव्हाड यांनी योग्य त्या वयात हे लक्षात घेतले व त्यांनी आपला मार्ग निवडला. ‘जिम्नॅस्टिक्स’ व योग यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत, रूढार्थाने आपण ज्याला ‘करिअर’ म्हणतो, ते यातच करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धांमध्ये विजयाची मोहोर उमटवणार्‍या जतिन आव्हाड यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. योगसाधनेचा हा विचार केवळ आपल्यापर्यंत मर्यादित न राहता, बाहेरच्या देशांमध्ये जाऊन आपल्याला तो शिकवता येईल का, असा विचार त्यांनी केला आणि त्या अनुषंगाने योगप्रशिक्षक होण्याच्या दिशेने त्यांनी पाऊले उचलली. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स’ या संस्थेमधून एक प्रशिक्षित योगशिक्षक म्हणून ते बाहेर पडले आणि गरुडझेप घेतली. आग्नेय आशियातील इंडोनेशिया या देशात जतिन आव्हाड योगप्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
 
2016 सालापासून जतिन येथे योग शिकवत आहेत. आपले अनुभव सांगताना जतिन म्हणतात की, “हळूहळू इथल्या लोकांनी योगाला आपल्या जीवनाचा भाग म्हणून स्वीकारलेच नाही, तर एक समृद्ध जीवनशैली म्हणून ते योगाकडे बघतात. तुलनात्मकदृष्ट्या बघायचे झाल्यास भारतामध्ये सर्वसाधारणपणे, जीवनशैलीतून उद्भवलेले आजार, स्वास्थ्याचे रक्षण अशा मर्यादित अर्थाने लोक योगाकडे बघतात, परंतु इथे मात्र योग शिकताना वेगवेगळी आसनं, शरीराची लवचिकता व सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे, योग हा मूळ प्रकार समजून घेण्यासाठी लोक योगाकडे वळतात. त्यामुळे योग शिकवणेसुद्धा तितकेच मजेशीर आहे. योग शिकण्यासाठी अनेक वेगवेगळ्या बॅचेसमध्ये लोक येतात. लोकांचा उत्साह दांडगा असल्यामुळे आम्हालासुद्धा योग शिकवण्यात तितकीच मजा येते,” असं ते म्हणतात. “समाजमाध्यमांवरील प्रचार-प्रसारामुळे योग शिकणे आता सोपे झाले आहे. परंतु, प्रशिक्षकांची योग्य पद्धतीने निवड करणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे,” असे मत जतिन व्यक्त करतात.
 
परदेशात योगप्रशिक्षण देणे या गोष्टीकडे आता काही तरुण करिअरसाठीचा एक पर्याय म्हणून बघत आहेत. त्यांना मार्गदर्शन करताना जतिन म्हणतात की, “योगाचे प्रशिक्षणार्थी म्हणून संधी उपलब्ध आहेत, परंतु त्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान असून चालणार नाही. येणार्‍या काळामध्ये त्याचे व्यावहारिकदृष्ट्या आपण सक्षम कसे होऊ, या दृष्टीने तरुणांनी विचार करणे गरजेचे आहे.”
 
व्हिएतनाममध्ये योगासोबत आहाराचाही समग्र विचार
 
संदीप भापकर हे व्हिएतनाममध्ये मागची दहा वर्षे योग शिकवत आहेत. ‘कॅलिफोर्निया फिटनेस अ‍ॅण्ड योगा’ या कंपनीच्या अंतर्गत संदीप तिथे योग शिकवत आहेत. योग्य त्या वयात, योग्य ते मार्गदर्शन लाभल्यामुळे, त्यांनीसुद्धा प्रशिक्षणार्थी होण्याचा मार्ग स्वीकारला. प्रशिक्षकाच्या भूमिकेतून आपले मनोगत व्यक्त करताना संदीप सांगतात की, “व्हिएतनाममध्ये लोक योगसाधनेकडे सकारात्मक पद्धतीने बघतात. आपल्या जीवनामध्ये योग अंगीकारण्याचा ते प्रयत्न करतात. योग शिकणारे आणि शिकवणारे यांच्यातील संवाद एकदा सुस्पष्ट झाला की गोष्टी सोप्या होतात. योगसाधना करीत असताना, बर्‍याचदा निव्वळ व्यायाम या एकाच अंगाने योगाकडे बघितले जातं. परंतु, त्यासोबतच योग ही एक समृद्ध जीवनशैली आहे. त्यासाठी योग्य त्या आहाराची गरज असते. व्हिएतनाममधील लोक योग शिकताना, त्यावेळेस आहाराचासुद्धा ते विचार करतात. हा समग्र विचार केल्यामुळे योगाचे फायदे दृश्यस्वरुपात आपल्याला इथे बघायला मिळतात.
 
संदीप भापकर यांचे काही मित्र आता केवळ आशियाच नाही, तर अन्य वेगवेगळ्या खंडांमध्ये योगप्रशिक्षण देत आहेत. त्यांचे अनुभव सांगताना ते म्हणतात की, “माणसं जसजशी आपल्या आरोग्याविषयी सजग झाली, तसतसे त्यांनी योग शिकत, योग्य ती जीवनशैली अंगीकारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भारतीय तरुणांसाठी इथे सुवर्ण संधी आहे. मात्र, त्यासाठी मूळ योग शिकणे आणि त्यात सातत्य ठेवणे गरजेचे आहे.”
 
एक दशकाहून अधिक काळ भारतासहित सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. योग हे भारताचे सांस्कृतिक बलस्थान आहे. योगसाधनेच्या माध्यमातून व्यक्तीचे जीवन परिपूर्ण कसे होईल, याचा विचार मांडणारी आपली संस्कृती आज जगभरात स्वीकारली जात आहे. आजमितीला एका सक्षम आणि सुदृढ समाजाची निर्मिती करायची असल्यास, योग्य ती जीवनशैली आकारावी लागेल, याची जाणीव लोकांना हळूहळू होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आगमनामुळे लोकांच्या जीवनातला वेग अजूनच वाढला. या वेगवान भवतालात माणूस स्वतःला हरवून बसेल की काय, अशी भीती निर्माण होत आहे. अशातच ‘कोऽहम’ ते ‘सोऽहम’ हा प्रवास ज्या संस्कृतीमध्ये घडतो, ती भारतीय संस्कृती विश्वाच्या कल्याणाचा ध्यास घेऊन पुढे येत आहे, याचीच सातत्याने प्रचिती येते.
 
 
Powered By Sangraha 9.0