"पासपोर्टकरिता अर्ज करण्यासाठी महिलेस पतीच्या परवानगीची गरज नाही"; पासपोर्ट प्राधिकरणाला मद्रास उच्च न्यायालयाची चपराक!

20 Jun 2025 19:37:35

चेन्नई(Women's Freedom): चेन्नईच्या अलंदूर येथील महिला पासपोर्टसाठी अर्ज करायला पासपोर्ट प्राधिकरणाकडे गेली असता प्राधिकरणाने पतीच्या स्वाक्षरीशिवाय पासपोर्ट मिळणार नाही, असा निर्णय दिला होता. या निर्णयाला एका याचिकेद्वारे मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर न्यायालयाने शुक्रवार दि. २० जून रोजी स्पष्ट सांगितले आहे की, "पासपोर्टसाठी अर्ज करताना पत्नीला तिच्या पतीची परवानगी आणि स्वाक्षरी घेणे आवश्यक नाही."

या याचिकेत महिलेने मद्रास उच्च न्यायालयाला असे सांगितले की, तिचे २०२३ मध्ये लग्न झाले आणि २०२४ मध्ये तिला मुलगी झाली, काही कारणास्तव वैवाहिक वाद निर्माण झाले, त्यामुळे तिच्या पतीने घटस्फोटासाठी अलंदूरच्या कनिष्ठ न्यायालयात अर्ज केला होता, जो अद्याप प्रलंबित आहे. महिलेने असे म्हटले की, जेव्हा तिने एप्रिल २०२५ मध्ये पासपोर्टसाठी अर्ज केला तेव्हा तिला सांगण्यात आले की, पतीच्या स्वाक्षरीशिवाय अर्ज मंजूर होणार नाही. पुढे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला वैवाहिक वादाबद्दल माहिती देण्यात आली होती तरीदेखील पतीची स्वाक्षरी मिळाल्यानंतरच तिच्या अर्जाची प्रक्रिया सुरु केली जाईल, असे सांगण्यात आले.

पासपोर्ट प्राधिकरणाच्या निर्णयाबाबतीत न्यायमूर्ती आनंद वेंकटेश यांनी म्हटले की, “पासपोर्टकरिता अर्ज करण्यासाठी पतीची परवानगी घेणे, हे महिला स्वातंत्र्याकडे वाटचाल करणाऱ्या समाजासाठी चांगले नव्हे, प्राधिकरणाचा हा निर्णय पुरुष वर्चस्ववादापेक्षा कमी नाही.”

न्या. आनंद वेंकटेश पुढे याबाबत आपले मत नोंदवितात की,”प्राधिकरण अधिकाऱ्यांचा पासपोर्ट काढण्यासाठी पतीच्या स्वाक्षरीचा आग्रह समाजाच्या पुरूष वर्चस्ववादाची मानसिकता दर्शवितो, जो महिलांना लग्नानंतर पतीच्या मालकीची वस्तू म्हणून वागवतो.”

न्यायालयाने पुढे असे नमूद केले की, जेव्हा पती-पत्नीचा घटस्फोट अर्ज कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित होता, तेव्हा पत्नीला तिच्या पतीची स्वाक्षरी घेण्यास भाग पाडून अधिकारी तिला जे अशक्य आहे, त्यांची पूर्तता करण्यास भाग पाडत होते, हे पूर्णपणे अयोग्य आहे. अशाप्रकारे, पासपोर्टसाठी अर्ज करताना पत्नीला तिच्या पतीची परवानगी किंवा स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने पासपोर्ट प्राधिकरणाला फटकारत चार आठवड्यांच्या आत पासपोर्ट जारी करण्याचे निर्देश दिले.



Powered By Sangraha 9.0