भुवनेश्वर : (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे वॉशिंग्टन भेटीचे निमंत्रण नाकारले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे अमेरिकेला भेट देता येणार नाही, असे सांगून त्यांनी निमंत्रणाला नकार दिल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी माध्यमांना सांगितले होते. ह्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वतःच यामागच्या कारणाचा उलगडा केला आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
ओडिशा (Odisha) मधील भाजप सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने भुवनेश्वर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी भेट नाकारण्याचे कारण सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "दोन दिवसांपूर्वी मी कॅनडामध्ये जी-७ परिषदेसाठी गेलो होतो. तिथे असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला. ते म्हणाले, तुम्ही कॅनडामध्ये तर आलाच आहात. तर वॉशिंग्टनमध्येही या. एकत्र जेवण आणि चर्चा करू. त्यांनी मला आदराने निमंत्रण दिले. परंतु मी त्यांना म्हणालो, आपल्या निमंत्रणासाठी आभारी आहे. त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. पण मला महाप्रभूंच्या भूमीत जायचे आहे. यासाठी मी ट्रम्प यांच्या निमंत्रणाला नम्रतापूर्वक नकार दिला. प्रभू जगन्नाथ यांची भक्ती मला इथे घेऊन आली", असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
जाहीर सभेला संबोधित करत असताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "भाजप सरकारने ओडिशामधील जनतेची मागणी पूर्ण करत पूरी जगन्नाथ मंदिराचे चार दरवाजे, तसेच रत्न भंडार पुन्हा उघडले आहे. भाजप सरकारने मागच्या वर्षभरात सुशासन आणि सार्वजनिक सेवा यशस्वीरित्या पुरविल्या आहेत", असे सांगितले.