"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा तर दुसरा मेळावा..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

20 Jun 2025 11:55:19



मुंबई :
आपला मेळावा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांचा तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उबाठा गटावर केला आहे. गुरुवार, १९ जून रोजी शिवसेना पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी तसेच सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आपला मेळावा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांचा तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे. गेल्या ५९ वर्षात शिवसेनेला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. परंतू, बाळासाहेबांचे तेजस्वी विचार, त्यांचे नेतृत्व आणि तमाम शिवसैनिकांच्या जिद्दीमुळे शिवसेनेचा वटवृक्ष वाढत गेला."

वारसदार म्हणवणारे सत्तेसाठी लाचार झाले!

"आपण बाळासाहेबांचा विचार जिवापाड जपले. त्यामुळेच शिवसेनेची घोडदौड जोरात सुरू आहे. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसचा आयुष्यभर विरोध केला त्याच काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचे काम केले. सत्तेसाठी लाचारी पत्करली. २०१९ ला त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा आणि हिंदूत्वाचा विश्वासघात केला. सरडाही रंग बदलतो, पण यांच्या इतके लवकर नाही. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार गमावला, पण हिंदुत्व सोडले नाही. पण त्यांचे वारसदार म्हणवणारे आज सत्तेसाठी लाचार झाले आहेत," अशी टीका त्यांनी केला.

यूतीसाठी उद्धव ठाकरे आगतिक, उतावीळ आणि लाचार झाले आहेत. माझ्याशी यूती करता का, असे त्यांचे सुरु आहे. माणसाचे दिवस आणि त्याची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही. बाळासाहेबांचा विचार सोडल्यामुळे आणि सत्तेसाठी लाचारी केल्यामुळे आज त्यांची ही परिस्थिती झाली आहे. मात्र, आपल्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हिंदूत्वाशी कधीही तडजोड होणार नाही, ही विचारधारा घेऊन आपण पुढे गेलो आहोत.


Powered By Sangraha 9.0