पुणे, पंढरपूरची आषाढी वारी ही केवळ धार्मिक उत्सव नाही, तर ती हिंदू समाजाच्या श्रद्धा, संस्कृती आणि सहिष्णू परंपरेचे मूर्त स्वरूप मानली जाते. मात्र अलीकडच्या काळात काही संघटनांकडून या वारीच्या पवित्रतेचा वापर हिंदू धर्म, देवता आणि धार्मिक परंपरांविरोधात होतो आहे, अशी माहिती निवेदनकर्त्या हिंदू संघटनांनी दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर पुणे येथील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते तुषार दामगुडे, डॉ. रोहन माळवदकर, हिंदू युवा प्रतिष्ठान, देवेंद्र फुंडेशन, बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती, विवेकवादी उत्सव समिती पुणे यांच्या वतीने पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार व पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संविधान दिंडी, पर्यावरण दिंडी यांसारख्या भावनिक व समाजहिताच्या वाटणाऱ्या संकल्पनांच्या आडून काही विचारसरणींच्या संघटना वारीत शिरकायेथी व करून मूर्तीपूजेविरोधात प्रचार करतात, हिंदू देवतांची अवहेलना करतात, धार्मिक आचारधर्मावर टीका करतात आणि जातीय तेढ पसरवण्याचे प्रयत्न करतात.
या प्रकारांमुळे धार्मिक वातावरण बिघडण्याची शक्यता असून, याचा फायदा विघातक व असामाजिक घटक घेत आपत्तीजनक परिस्थिती निर्माण करू शकतात, असेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.
वारीचे पारंपरिक, भक्तिमय आणि शांत स्वरूप अबाधित राहावे यासाठी अशा प्रवृत्तींच्या हालचालींवर तातडीने नियंत्रण ठेवावे, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी आणि पोलिस प्रशासनाने सजगता राखावी, अशी ठाम मागणी संघटनांनी केली आहे.
पोलिस प्रशासनाने निवेदनाची नोंद घेतली असून, पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित शाखांना पाठवण्यात आले असल्याची माहिती निवेदनकर्त्यांकडून देण्यात आली आहे .