‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभ सोडून उद्धवजी...; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर टीका

20 Jun 2025 12:42:00


मुंबई : शिवसेना संपली नाही म्हणत असताना, स्वतःतर ‘सेना’ गमावलीच, पण ‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभही सोडून उद्धवजी तुम्ही सोनिया चरणी नतमस्तक झालात, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "उबाठा गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलताच होती. जेव्हा जनाधार संपतो, तेव्हा आरोळ्या वाढतात. तेच आज त्यांनी केलं. शिवसेना संपली नाही म्हणत असताना, स्वतःतर ‘सेना’ गमावलीच, पण ‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभही सोडून उद्धवजी तुम्ही सोनिया चरणी नतमस्तक झालात. मोदीजी-अमितभाई-देवेंद्रजी यांच्यावर वैयक्तिक आरोप करणं सोपं आहे. पण हे नेते जेव्हा देशभर, राज्यभर दौरे करत होते, तेव्हा उद्धवजी मातोश्रीतून ऑनलाईन भाषण करत होते. हे महाराष्ट्रातील जनतेनं बघितलेलं आहे," अशी टीका त्यांनी केली.

"राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा..."; वर्धापन दिन सोहळ्यात एकनाथ शिंदेंचा उबाठावर घणाघात

मुंबईतल्या मराठी माणसाचं काय केलं?

जे ‘मुंबई आमची’ म्हणतात, त्यांनी आधी सांगावं की, मुंबईतल्या मराठी माणसाचं काय केलं? महापालिकेत सत्ता असतानाही त्यांच्या झोपड्या, पाण्याच्या योजना, शिक्षण, आरोग्य यावर काही केलं का? मुंबईकरांसाठी कोस्टल रोड, मेट्रो, क्लस्टर रिडेव्हलपमेंट, झोपडपट्टी पुनर्वसन योजना या देवेंद्रजींच्या पुढाकारानं झाल्यात हे मुंबईकरांना माहित आहे. मुंबई आमची आहे, हे तुम्ही ओरडून सांगत राहा, पण विकास, सुरक्षितता आणि सन्मान हवा असेल, तर मुंबईवर भाजपा- महायुतीचाच झेंडा फडकला पाहिजे हीच मुंबईकरांची इच्छा आहे," असेही ते म्हणाले.

"उद्धवजी, तुम्ही अशीच गरळ ओकत रहा, टिंगल- टवाळी करीत रहा, टोमणे मारीत रहा. तुमचे पुढील आयुष्य यातच जाणार आहे. लोकसेवा आणि लोककल्याणासाठी मनात तळमळ असावी लागते, ती तुमच्यात नाही. ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला यापूर्वीच कळलेली आहे. आता पुढील निवडणुकांमध्ये जनता त्यावर शिक्कामोर्तब करणार आहे," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.




Powered By Sangraha 9.0