पुणे : मनसेसोबत यूती करण्याशिवाय उद्धव ठाकरेंकडे दुसरा पर्यायच नाही. उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती केली तर त्यांच्या थोड्या तरी जागा येतील, असा टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. शुक्रवार, २० जून रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, "मनसेसोबत यूती करण्याशिवाय उद्धव ठाकरेंकडे दुसरा पर्यायच नाही. उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती केली तर त्यांच्या थोड्या तरी जागा येतील. उद्धव ठाकरेंचे अनेक नगरसेवक एकनाथ शिंदेंकडे गेलेत. निवडणूकीला अजून चार महिने आहेत. तोपर्यंत बघूया आणखी जातील. उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेसला सोबत घेऊन पाहिले पण काही जमले नाही. आता ते मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. युतीला उशीर का होतो आहे? जर काहीही अट नाही तर दोन मिनिटात करा. रोज यूती होणार होणार सांगतात. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, गणेश नाईक, छगन भुजबळ, नारायण राणे हे सगळे एकत्र होते तरीसुद्धा जनसंघ होता, भाजप होता. भाजप वाढतच राहिला. शिवसेनेतील बाकी सगळे विखुरले गेले," असे ते म्हणाले.
हा पवारांच्या मनाचा मोठेपणा!
मुंबईत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे शक्तीस्थान अधिक असल्याचे शरद पवार म्हणाले होते. यावर बोलताना ते म्हणाले की, "शरद पवारांना अलीकडच्या काळात त्यांच्यापेक्षा आणखी कुणीतरी पॉवरफुल आहे असे म्हणावे लागते आणि त्यांच्यापेक्षा लहान माणसाला पॉवरफुल म्हणावे लागते, ही चांगली गोष्ट आहे. हा पवारांच्या मनाचा मोठेपणा आहे," असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
हिंदीचा आग्रह नाही!
"प्रत्येकच विषयाचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही. त्यातील समाजाकारणसुद्धा शिकले पाहिजे. हिंदी ही शाळांमध्ये सक्तीची केली नाही. जगात जायचे असल्यास इंग्रजी भाषा आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरणात तीन भाषा शिकवा असे म्हटले आहे. तिसरी भाषा कुठलीही असू शकते. हिंदीचा आग्रह नाही," असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.