सोलापूर : यूती संदर्भात राज ठाकरे साहेबांच्या मनात जे आहे, तेच माझ्या मनात आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. शुक्रवार, २० जून रोजी सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसैनिकांनी त्यांची भेटही घेतली.
बाळा नांदगावकर म्हणाले की, "राज ठाकरे साहेबांच्या मनात जे आहे, तेच माझ्या मनात आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यावेळी ठाकरे बंधूंना एकत्र करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला होता. एखादी गोष्ट झाली, तर राजकारणामध्ये त्याचे चांगले वाईट घडत असते. पण पुढे काय होईल, याची मला कल्पना नाही. त्यामुळे त्याविषयी भाष्य करणे मला उचित वाटत नाही. वेळ नेहमीच येत असते. मात्र, कुठलीच वेळ कधी वाईट नसते. महाभारतात 'समय बडा बलवान होता है,' असे एक वाक्य आहे. या वाक्यातच बरेच काही अर्थ असतात. युतीबाबत मीही राज ठाकरे यांना विचारात आहे की, तुमच्या मनात नेमके काय सुरु आहे. पण मला अजून उत्तर सापडत नाही," असे ते म्हणाले.
कोणत्याही राज्यावर भाषेची सक्ती होता कामा नये!
"हिंदी सक्तीविरोधात मनसेची काल बैठक पार पडली. या बैठकीत हिंदीला पूर्णपणे विरोध करण्यात आला. हिंदी भाषेशी आमचे काहीही वावडे नाही. पण ती राष्ट्रभाषा नसून राज्यभाषा आहे. त्यामुळे कोणत्याही राज्यावर कुठलीही भाषेची सक्ती होता कामा नये. हिंदी भाषा आमच्यावर लादणार असतील तर आमचा त्याला विरोध आहे. गरज नसताना एखादा विषय वाढवू नका. तो विषय योग्य वेळी संपवणे योग्य असते, अशी आमची राज्य सरकारला विनंती आहे," असेही बाळा नांदगावकर म्हणाले.