महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना आता गुगलचे बळ मिळेल - मंत्री मंगलप्रभात लोढा

20 Jun 2025 15:06:59

Startups Maharashtra will now get the power of Google Minister Mangalprabhat Lodha
 
मुंबई : महाराष्ट्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI स्टार्टअप्सना माहिती क्षेत्रातील जागतिक कंपनी गुगलचे बळ मिळणार असून या स्टार्टअप्सना उद्योगासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात संधी उपलब्ध होणार आहे. गुगलच्या व्हेंचर कॅपिटल अँड सेटअप पार्टनरशिप विभागाचे प्रमुख डॉ.अपूर्व चॅमरिया यांनी आज कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयातील दालनात भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली.
 
महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी मंत्री श्री मंगलप्रभात लोढा प्रयत्नशील आहेत. या अनुषंगाने माहिती क्षेत्रातील अग्रगण्य जागतिक कंपनी गुगलच्या सहकार्याने महाराष्ट्रात उद्योगाच्या नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. गुगलच्या व्हेंचर कॅपिटल अँड सेटअप पार्टनरशिप विभागाचे प्रमुख डॉ. अपूर्व चॅमरिया यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी कौशल्य विभागाचे आयुक्त लहुराज माळी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे बैठकीला उपस्थित होते.
 
जगातल्या नऊ देशात गुगल द्वारे AI प्रशिक्षण सेंटर्स कार्यरत आहेत. स्टार्टअप्स करिता भारतातही अशाप्रकारचे सेंटर स्थापन करण्याचे नियोजन करत असल्याची माहिती यावेळी गुगलचे अधिकारी श्री. चॅमरिया यांनी दिली. निवड प्रक्रियेद्वारे उत्कृष्ट ठरणाऱ्या स्टार्टअप्सना यात संधी मिळणार आहे. देशात अशा प्रकारचे हे पहिलेच केंद्र ठरणार असून महाराष्ट्रातील नव्या उमेदीने उद्योग करू पाहणाऱ्या युवकांना या निमित्ताने जागतिक कवाडे उघडणार असल्याचा विश्वास यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. सध्या यासंदर्भात प्राथमिक चर्चा सुरु असून लवकरच सामंजस्य करार होईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान एकीकडे स्टार्टअप्ससाठी सेंटर तर आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम ही महाराष्ट्रात सुरु करण्याची तयारी गुगलने दाखवली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0