मुंबई : " विरोधकांनी सावरकरांवर जेवढे आरोप केले, त्या सगळ्यांचे सप्रमाण खंडन झालं. ज्या अर्थी त्यांच्या पश्चात आज सुद्धा सावरकरांची आठवण काढावी लागते, त्या अर्थी सावरकर आजच्या विरोधकांना पुरून उरले " असे प्रतिपादन प्रख्यात हिंदुत्ववादी वक्ते सच्चिदानंद शेवडे यांनी केले. ब्रह्मांड सज्जन शक्ती सांस्कृतिक मंच, ब्रह्मांड परिसर, ठाणे आयोजित सावरकर: एक झंझावात या कार्यक्रमात ते बोलत होते.
दि. १ जून रोजी ठाण्याच्या स्वस्तिक पाल्मस् कम्युनिटी हॉल येथे ब्रह्मांड सज्जन शक्ती सांस्कृतिक मंच यांच्यावतीने सावरकर: एक झंझावात या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक राजेंद्र गोडबोले यांच्या हस्ते डॉ सच्चिदानंद शेवडे यांचे स्वागत करण्यात आले.प्रख्यात हिंदुत्ववादी लेखक, हिंदू राष्ट्ररत्न डॉ सच्चिदानंद शेवडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जीवनगाथा प्रेक्षकांसमोर मांडली. क्रांतिकारी सावरकरांनी इंग्रजांच्या विरोधातील केलेला संघर्ष इथपासून ते मराठी काव्याला नवा वृत्त प्रदान करणारे सावरकर अशा विविध दृष्टिकोनातून सावरकरांच्या जीवनकार्याची मांडणी शेवडे यांनी केली. क्रांतिकारकांची जीवनचरित्र व त्यांचे आदर्श आजच्या पिढीसाठी का महत्त्वाचे आहेत हे या व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी श्रोत्यांना सांगितलं.
देशविघातक डावी प्रवृत्ती ओळखणे ही काळाची गरज!
आपल्या व्याख्यानादरम्यान देश विघातक शक्तींवर भाष्य करताना सच्चिदानंद शेवडे म्हणाले की " जगाच्या पाठीवर कुटुंब व्यवस्था सर्वप्रथम डाव्या प्रवृत्तींमुळे मोडकळीस आली. एखादे राष्ट्र संपवायचे असेल तर आधी त्या राष्ट्राच्या संस्कृतीवर श्रद्धा स्थानांवर घाला घातला पाहिजे, मूल्यांवर हल्ला केला पाहिजे हे डाव्यांनी ओळखले व त्या दृष्टीने त्यांनी समाजमनावर आघात केला. आपण ही देश विघातक प्रवृत्ती वेळेत ओळखली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केलं"