सिक्कीममध्ये भूस्खलन! लष्कराच्या तीन जवानांचा मृत्यू, नऊ बेपत्ता! आत्तापर्यंत काय घडलं? – वाचा सविस्तर
02 Jun 2025 19:44:56
सिलीगुडी : उत्तर सिक्कीमच्या चाट्टेन येथे रविवारी रात्री झालेल्या भूस्खलनात लष्कराचे तीन जवान ठार झाले असून नऊ जण बेपत्ता आहेत. तब्बल १,६०० पर्यटक या भूस्खलनात अडकल्याचे समजते. गुरूवार, दि. २९ मे रोजी आठ पर्यटक बेपत्ता झाले. प्रवास करत असताना त्यांचे वाहन तिस्ता नदीत कोसळले. त्यानंतर ३० मे रोजी लष्करी छावणीवर भूस्खलन झाले. ज्यामध्ये लष्कराच्या तीन जवानांचे मृतदेह सापडले.
उत्तर सिक्कीममध्ये रविवारी रात्री उशिरा पुन्हा लाचेन नदीतील पाण्याची पातळी वाढली. यात चट्टेन येथे भूस्खलन झाले. एकूण १,६०० पर्यटक या भूस्खलनात अडकले. गुरुवार, दि. २९ मे रोजी आठ पर्यटकांसह एकूण नऊ जण बेपत्ता झाले होते. यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. लाचेनपासून सुमारे तीन किमी अंतरावर असलेले चट्टेन येथे अनेक लष्करी छावण्याही आहेत. लष्करी छावणीवर भूस्खलन झाले आणि नऊ जण बेपत्ता आणि लष्कराचे तीन जवान ठार झाले.
“लाचेन नदीतील पाण्याची पातळी वाढल्यानंतर चट्टेन येथील लष्करी छावणीवर भूस्खलन झाले. लष्कराच्या तीन जवानांचे मृतदेह सापडले आहेत आणि नऊ जवान बेपत्ता आहेत. लष्कराकडून शोध मोहीम सुरू आहे,” असे मंगन जिल्ह्यातील चुंगथांगचे उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण थटल यांनी सांगितले. ३० मे पासून लाचुंगमध्ये अडकलेल्या १,६०० पर्यटकांना सोमवारी सकाळी वाचवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
“सोमवारी लाचुंगमधून ३८० मुलांसह सुमारे १,६०० पर्यटकांना वाचवण्यात आले. मुसळधार पावसामुळे अनेक भूस्खलन झाले आणि नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या. रविवारी रात्री ढीगारा उचलण्यात आला. यानंतर, दि. २ जून सोमवारी सकाळी बचाव कार्यही सुरू झाले. लाचेनमध्ये अजूनही सुमारे दीडशे पर्यटक अडकले आहेत. ते सुरक्षित आहेत आणि हॉटेलमध्ये आहेत. एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) देखील तेथे आहे,” असे मंगनचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.