चीनचा आशियामध्ये लष्करी कारवाईचा मनसुबा

02 Jun 2025 16:02:08
china is increasing border force
मुंबई : चीन हा आशियामध्ये सैन्य कारवाईची तयारी करत असल्याचा इशारा अमेरिकेच्या संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी दिला आहे. त्याचबरोबर आशियामधील अमेरिकेच्या भागीदारांनी संरक्षण खर्चात वाढ करून संरक्षण सिद्धता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. शनिवार, दि. 31 मे रोजी सिंगापूरमधील शांग्री-ला परिषदेत संबोधित करताना अमेरिकेच्या इंडो-प्रशांत भूभागातील अमेरिकेच्या बदलत्या रणनीतीविषयी बोलताना चीनच्या वाढत्या धोक्याविषयी भाष्य केले.


आशियाबाबतच्या महत्त्वाकांक्षी आणि विस्तारवादी धोरणामुळे चीन हा आशियामध्ये लष्करी कारवाई करण्याची शक्यता अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी व्यक्त केली आहे. तसेच, “अमेरिकेच्या भागीदारांनी संरक्षण सिद्ध राहावे,” असे आवाहनही त्यांनी केले आहे. चीन हा देश कायमच त्यांच्या विस्तारवादी भूमिकांसाठी ओळखला जातो. अनेक देशांबरोबर चीनचे सीमाविवाद सुरू आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये चीनने त्यांच्या संरक्षण खर्चातदेखील लक्षणीयरित्या वाढ केली आहे.
चीन-तैवान संघर्षावर भाष्य करताना “वारंवार लष्करी सामर्थ्य आणि सराव वाढवून चीन हा तैवानवर दबाव वाढवण्याच्या प्रयत्नात आहे,” असेही हेगसेथ यांनी म्हटले आहे. हेगसेथ यांनी त्यांच्या भाषणामध्ये चीनच्या वाढत्या लष्करी सामर्थ्याचा उल्लेख ‘आशियासाठी धोक्याची घंटा’ असा केला. शेजारी राष्ट्रांचे भूभाग बळकावणे, दक्षिण चीन समुद्रात बेकायदेशीर विस्तार करणे, लष्करी सामर्थ्य वाढवून दहशत निर्माण करणे असे विविध मार्ग चीन चोखंदळत आहे. मात्र, “अमेरिका स्वतःचे आणि आशियातील तिच्या मित्र देशांचे चीनच्या वाढत्या विस्तारवादापासून रक्षण करण्यास सक्षम आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
फिलीपिन्स संघर्षाची पार्श्वभूमी


दक्षिण चीन समुद्रावर चीन स्वतःचा दावा सांगत आला आहे. यातूनच फिलीपिन्सबरोबर त्याचा संघर्ष वाढला आहे. या संघर्षामुळे दक्षिण चिनी समुद्रातील प्रादेशिक तणावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चीनचे हवाईदल आणि नौदल सातत्याने फिलीपिन्सनजीक असलेल्या स्कारबोरो शोल बेटांजवळ लष्करी सराव करत आहेत. त्यामुळे एकूणच परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. चीनच्या या उद्दामपणामुळे तैवानमध्येदेखील तणाव वाढला आहे.
Powered By Sangraha 9.0