मुंबई: आज भारत क्रीडा क्षेत्रात आपला ठसा सर्वत्र उमटवित आहे. दुर्लक्षित खेळांचाही यात समावेश आहे. पूर्वी खेळाडूंना प्रतिकूल परिस्थितीशी झगडून वर यावे लागे. साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील जागतिक दर्जाचे कुस्तीपटू श्री. सुधीर पुंडेकर हे असाच संघर्ष करून पुढे आले. डी. एच. गोखले व श्यामला गोखले धर्मादाय न्यास पुरस्कृत आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित अंत्योदय पुरस्कार - २०२५ श्री. पुंडेकर यांना आज प्रदान करण्यात आला. श्री. पुंडेकर जगात पहिल्या पाच कुस्तीविरांमध्ये गणले जातात. ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये झालेल्या सोहळ्याला प्रमुख अतिथी डॉ. हेमंत विष्णू सवरा, खासदार, पालघर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मोबाईल सोडवून मैदानात आणत होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण
श्री. सुधीर पुंडेकर यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात मुळीकवाडी या त्यांच्या मूळ गावी प्रचंड कष्ट घेत शिव समर्थ क्रीडा संकुल स्थापन केले. ते अनेक वर्षे होतकरू ग्रामीण तरुणांना विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या कार्याबद्दल डॉ. सवरा यांच्या हस्ते अंत्योदय पुरस्कार मानचिन्ह व ₹ एक लाख देऊन सत्कार करण्यात आला. सन २००० पासून हा पुरस्कार तळागाळातील समाजघटकांच्या विकासासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येत आहे. या प्रसंगी बोलताना श्री. पुंडेकर म्हणाले, “हा पुरस्कार घेऊन मी भारावून गेलोय. मला आलेल्या समस्या होतकरू खेळाडूंना येऊ नयेत म्हणून हा प्रवास आहे. प्रशिक्षण व समुपदेशन मला पूर्ण महाराष्ट्रात द्यायचे आहे. तरुणांना मोबाईल सोडवून मैदानात आणणे गरजेचे आहे. फ़िजिओ-थेरपी विभागही सुरु करायचा आहे.” डॉ. सवरा यांनी सांगितले, “पुंडेकर यांच्यासारख्या हिऱ्याला पुरस्कारासाठी शोधून काढले हे विलक्षण आहे. सीएसआरच्या माध्यमातून त्यांच्या पुढील प्रवासाला नक्कीच हातभार लागेल.” रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, “देशी खेळांना महत्त्व देण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. बेल्ट रेसलिंग सुद्धा देशीच आहे कारण झारखंडसारख्या राज्यात तो परंपरागत खेळला जातो. त्याच्या पुनरुज्जीवनात अग्रेसर असलेल्या सुधीर पुंडेकरांना पुरस्कार दिला गेला ही आनंदाची गोष्ट आहे.”
बेल्ट रेसलिंगमधील यश, तरुणांना घडविण्याची धडपड
सुधीर हणमंत पुंडेकर यांचा जन्म मुळीकवाडीमध्ये २० ऑगस्ट १९९० रोजी सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. आजोबांचे नातवाला पैलवान बनविण्याचे स्वप्न होते. सुधीरनी शिक्षण घेतानाच बाराव्या वर्षापासून रोज ५००-१,००० बैठका व २ किमी पळणे असा व्यायाम सुरु केला. आर्थिक पाठबळ नसतानाही सातारा तालीम संघात कुस्ती व ज्युडो आणि पुढे पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात बेल्ट रेसलिंगचा सराव सुरु ठेवला. टाटा ट्रस्ट व इतरांच्या मदतीने किर्गिझस्तान, बेलारूस, तुर्कमेनिस्तान, दक्षिण कोरिया व हंगरीतील स्पर्धांत सहभागी होऊन पदके जिंकण्याची संधी मिळाली. परत आल्यावर आधी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व समर्थ रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड, यांच्यासोबत, तर नंतर मुळीकवाडीत शिव समर्थ क्रीडा संकुल स्थापन करून ग्रामीण तरुणांना क्रीडा प्रशिक्षण देण्याचे ध्येय मूर्त स्वरुपात आणले. अनेक कंपन्यांच्या आर्थिक सहाय्यातून व श्री. पुंडेकर यांच्या मेहनतीतून उभे राहिलेले ७,५०० चौ. फुटाचे क्रीडा संकुल रोज ५० हून अधिक खेळाडूंना विनामुल्य प्रशिक्षण देते. आजपर्यंत ५०० हून अधिक तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले असून काहींनी विविध स्पर्थांत यश मिळविले आहे. आरोग्य, व्यायाम, सकस व विषमुक्त आहार आणि मैदानी खेळांचे महत्त्व यांबद्दल शिबिरांतून ते प्रबोधन करतात. महिला स्वसंरक्षण, गरीब खेळाडूंना दुखापतीचे मोफत उपचार मिळवून देणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्ट ऑफ लिविंगच्या सहाय्याने आनंद शिबिरे, तरुणांसाठी पोलिस व सैन्यभरतीसाठी मोफत मार्गदर्शन आणि लहानांसाठी संस्कारवर्गही ते घेतात. देशातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणे, तसेच पुढची पिढी सशक्त, बलदंड व संस्कारी करणे हे त्यांचे स्वप्न असून, ते निश्चितच साकार होताना दिसत आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी