2026 मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचे उखडू

02 Jun 2025 14:47:25
Won

कोलकाता : “2026 मध्ये पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी सरकार कायमचे उखडून टाकू. जेव्हाही शुभेंद्रु विधानसभेला उभे राहतात, तेव्हा दीदी घाबरते. निवडणुकीत हिंसाचाराचा आधार घेतात. लोकशाहीत हिंसाचाराला जागा नाही. हिंसेविना मतदान घ्या; मग तुम्हाला वास्तव काय ते कळेल,” अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रविवार, दि. 1 जून रोजी कोलकाताच्या नेताजी स्टेडियममध्ये भाजप कार्यकर्त्यांना शाह यांनी संबोधित केले.

यावेळी अमित शाह म्हणाले की, “पश्चिम बंगालमध्ये केवळ निवडणूक मर्यादित नाही, तर सुरक्षा हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. गेली अनेक वर्षे ममता बॅनर्जी यांच्या आशीर्वादाने मोठ्या संख्येत घुसखोर बांगलादेशातून भारतात प्रवेश करतात. इथे व्होटबँकचे राजकारण केले जाते; परंतु हे दीर्घकाळ चालणार नाही. 2017च्या निवडणुकीपासूनच आम्ही 19व्या लोकसभेची तयारी केली होती. 2015च्या निवडणुकीत आम्ही 55 जागा जिंकल्या. 24व्या लोकसभेत भाजप 97 जागा पुढे होती. आम्हाला 143 जागांवर 40 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. याचा अर्थ लक्ष्य गाठण्यासाठी आणखी काही मेहनत घेतली, तर पुढील निवडणुकीनंतर आपले सरकार स्थापन होईल,” असे केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी आकडेवारीसह सांगितले.

‘वक्फ विधेयक’ आणून काय चुकले?


“मुर्शिदाबाद येथे दंगल झाली, तेव्हा आम्ही ममता बॅनर्जी यांना दंगल रोखण्यासाठी ‘बीएसएफ’ पाठवण्याचा आग्रह धरला; परंतु ममता यांनी त्यावर असहमती दर्शवली. हिंदूंवर अत्याचार केले. त्यानंतर ‘बीएसएफ’ त्यांना वाचवण्यासाठी पोहोचली. मुर्शिदाबादची दंगल राज्य पुरस्कृत होती. मोदी सरकारने ‘वक्फ विधेयक’ आणून काय चुकीचे केले. ‘वक्फ विधेयका’चा विरोध करून ममता बॅनर्जी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे?” असा सवालही अमित शाह यांनी केला.

Powered By Sangraha 9.0