समृद्धी महामार्ग: इगतपुरी ते कसारा अवघ्या ८ मिनिटात

02 Jun 2025 20:49:12

samrudhi mahamarga



मुंबई,दि.२ : प्रतिनिधी 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग आता पूर्णपणे सुरू होणार असून नागपूर ते मुंबईपर्यंत हा प्रवास केवळ आठ तासांत करता येणार आहे. येत्या ५ जूनपासून इगतपुरी ते आमने हा ७६ किलोमीटर लांबीचा रस्ताही प्रवाशांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी नागपूरहून न थांबता थेट मुंबईपर्यंतचा प्रवास करता येणार आहे.

नागपूर ते मुंबई अशा रस्ते प्रवासासाठी एमएसआरडीसीने ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग सुरू केला आहे. आतापर्यंत यातील ६३५ किलोमीटरचा मार्ग प्रवाशांसाठी खुला आहे. मात्र इगतपुरी ते आमने या ७६ किलोमीटरच्या रस्त्याचे काम सुरू होते. अखेर ते पूर्णत्वास आले आहे. गुरुवार, दि. ५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उर्वरित मार्गाचे लोकर्पण होणार आहे. लोकार्पणानंतर लगेचच हा मार्ग सामान्य वाहतुकीसाठी सुरू होईल.


समृद्धी महामार्गाचे टप्पे


नागपूर ते शिर्डी - ५२० किमी
शिर्डी ते भरवीर - ८० किमी
भरवीर ते इगतपुरी - २५ किमी
इगतपुरी ते आमने - ७६ किमी


इगतपुरी ते कसारा अवघ्या ८ मिनिटात


इगतपुरी ते आमने हा ७६ किलोमीटरचा मार्ग डोंगराळ आहे. त्यामुळे येथे पाच बोगदे उभारण्यात आले आहेत. त्यात इगतपुरी येथे ७.७८ किमीचा राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा असून यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर अवघ्या आठ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे.

महाराष्ट्राच्या १० जिल्ह्यांना थेट आणि १४ जिल्ह्यांना अप्रत्यक्षपणे जोडणारा मार्ग
 
समृद्धी महामार्गाच्या बांधकामात वन्यजीवांची सुरक्षितता जपण्यासाठी ८० हून अधिक संरचना उभारण्यात आल्या आहेत. या महामार्गाजवळ १८ स्मार्ट टाऊनशिप विकसित केल्या जाणार आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या १० जिल्ह्यांना थेट आणि १४ जिल्ह्यांना अप्रत्यक्षपणे जोडणार आहे, ज्यामुळे राज्याच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीला मोठा हातभार लागेल. 67,000 कोटी रुपये खर्च करून उभारलेला हा महामार्ग उद्योग, व्यापार आणि प्रवासात क्रांतिकारी बदल घडवेल.
Powered By Sangraha 9.0