शेख हसीना यांच्यावर सामूहिक हत्येचा आरोप

02 Jun 2025 15:55:55
Shaikh Haseena blamed for murders

ढाका: आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि अन्य दोघांवर सामूहिक हत्या करण्याव्यतिरिक्त अन्य काही आरोप ठेवले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनातल्या हिंसाचारप्रकरणी हे आरोप ठेवण्यात आले आहेत. हसीना यांच्या अनुपस्थितीतच त्यांच्याविरोधातल्या खटल्याच्या सुनावणीला रविवार, दि. 1 जून रोजीपासून सुरुवात करण्यात आली.


हसीना यांचे सरकार सत्तेवरून पायउतार झाल्याच्या दहा महिन्यांनंतर या खटल्याच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आहे. हसीना यांनी पद्धतशीरपणे आंदोलन दडपून टाकण्यासाठी बळाचा वापर केल्याचा आरोप औपचारिकपणे आरोप निश्चित करण्यात आले असल्याचे आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाच्या त्रिसदस्यीय पीठाने सांगितले.


या लवादाने हसीना आणि तत्कालीन गृहमंत्री असादुझ्झमान खान कमाल यांच्याविरोधात नव्याने अटक वॉरंट बजावले आहे. तिसरे आरोपी, तत्कालीन पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामुन, सध्या खटल्यासाठी कोठडीत आहेत. बांगलादेशच्या इतिहासात प्रथमच या लवादाच्या कामकाजाचे टीव्हीवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले.


गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये विद्यार्थी आणि पोलिसांसह शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. त्या काळात सामूहिक हत्याकांडाच्या आरोपांसाठी हसीनाच्या पक्षाचे आणि सरकारचे बहुतेक वरिष्ठ नेते आणि अधिकार्‍यांना अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी दि. 15 जुलै ते दि. 15 ऑगस्ट रोजीदरम्यान झालेल्या या आंदोलनादरम्यान 1 हजार, 400 लोक ठार झाले होते. हसीना यांचे सरकार पायउतार झाल्यानंतरही हे हिंसक आंदोलन सुरू राहिले होते.

Powered By Sangraha 9.0