मुंबई ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पात लक्षणीय प्रगती

02 Jun 2025 15:40:34
Mumbai Bullet train

मुंबई : मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पात आता महाराष्ट्रातही कामांना गती मिळते आहे. बीकेसी ‘बुलेट ट्रेन’ स्थानकाचे बांधकाम अत्यंत वेगात सुरू असताना आता विरार ‘बुलेट ट्रेन’ स्थानकासाठी स्लॅब कास्टिंग सुरू झाले असल्याची माहिती ‘नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनएचएसआरसीएल)ने दिली आहे.

‘एनएचएसआरसीएल’ने दिलेल्या माहितीनुसार, विरार ‘बुलेट ट्रेन’ स्थानकावर पहिल्या स्लॅबचे कास्टिंग सुरू झाले आहे. हा स्लॅब 50 मीटर लांब, 35.32 मीटर रुंद असून सुमारे 300 मिमी जाडीचा आहे, ज्यामध्ये 1 हजार, 555 घन मीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. या स्तरावर अशा एकूण नऊ स्लॅब असतील, जे स्थानकावर चार ट्रॅक टाकण्याच्या कामाचा पाया तयार करतील.
स्थानकात दोन स्तर असतील, कॉन्कोर्स स्तर (नागरिकांसाठी सुविधा) आणि ट्रेन स्तर, ज्याची एकूण लांबी 425 मीटर आहे. इथे लिफ्ट आणि विद्युत जिन्यांची सुविधा असणार आहे. विरार ‘बुलेट ट्रेन’ स्थानक डोंगरावर स्थित आहे. स्थानकाच्या दोन्ही बाजूंना फलाट असतील.
Powered By Sangraha 9.0