आता व्हॉट्सअपवर येणार शिस्तभंगाची नोटीस

02 Jun 2025 18:00:58
Disciplinary notices will be issued on WhatsApp

मुंबई : आता शासकीय कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवार, दि. २ जून रोजी याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, व्हॉट्सअपवर पाठवली गेलेली नोटीस ग्राह्य धरली जाणार आहे.

यापूर्वी शिस्तभंगाशी संबंधित कागदपत्रे, जसे की दोषारोप पत्र किंवा चौकशी अहवाल, व्यक्तिशः किंवा नोंदणीकृत टपालाने पाठवले जायचे. मात्र, अनेकदा ही कागदपत्रे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी होत्या. यामुळे आता सरकारने नवीन पद्धती अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. आता शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर ही कागदपत्रे पाठवली जाणार आहेत. याशिवाय, व्हॉट्सअॅपद्वारेही नोटिसा पाठवण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना जलद माहिती मिळेल आणि त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधीही लवकर मिळेल.

परिपत्रकात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, व्यक्तिशः किंवा टपालाने कागदपत्रे पाठवण्याची जुनी पद्धत कायम राहील. पण त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कामकाजाला गती देण्यावर भर दिला जाईल. यासाठी शासकीय ई-मेल आयडी आणि व्हॉट्सअॅपचा वापर करताना संबंधित व्यक्तीने पोचपावती देणे बंधनकारक आहे. ही पावती प्रकरणाच्या कागदपत्रांना जोडली जाईल. हा निर्णय महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ अंतर्गत लागू होईल. सरकारचा हा निर्णय शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे शिस्तभंगाच्या प्रकरणांचा निपटारा जलद होण्याची अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0