नागपूर : उद्या जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लागल्या तरी भाजप आणि महायूती तयार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. सोमवार, २ जून रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "भाजपमध्ये कुठलीही नियूक्ती रखडलेली नाही. ८० जिल्हे आणि १२३२ तालुके पूर्ण झाले आहेत. १ लक्ष बुथ पूर्ण झाले आहेत. दीड कोटी प्राथमिक सदस्यता नोंदणी झाली आहे. जवळपास १ लाख सक्रीय सदस्य झाले आहेत. लवकरच प्रदेशाध्यक्षांचा निर्णय होईल. आमच्याकडे संघटन पर्व पूर्ण झाले आहे. त्यामुळे उद्या जरी निवडणूक लागली तरी भाजप आणि महायूती तयार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा सारांश बघितल्यास ऑक्टोबरपर्यंत निवडणूका पार पडायला हव्या," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "१३ हजार पदांच्या या निवडणूका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था असल्याशिवाय विकासाचा मार्ग मोकळा होत नाही. आता प्रशासकीय राज्य आहे. पण जोपर्यंत विकासाच्या कामांमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग राहत नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही. त्यामुळे मोदीजींचे सरकार, महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था या तिघांनी एकत्रितपणे काम केल्यास समाजाला जास्त न्याय मिळेल."