बिहार निवडणूक २ ते ३ टप्प्यात होण्याची शक्यता

02 Jun 2025 18:16:20
Bihar elctions might be held in 2 or more Phases

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीस वेग दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बिहार विधानसभा निवडणुका दोन ते तीन टप्प्यात होऊ शकतात. दिवाळी आणि छठपूजा लक्षात घेऊन निवडणुकीच्या तारखा निश्चित केल्या जातील. बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संपत आहे, त्यामुळे त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. मुख्य आयुक्त या महिन्यात जूनमध्ये बिहारला भेट देतील. यावेळी दिवाळी आणि छठ पूजा ऑक्टोबर महिन्यात साजरी केली जाईल. अशा परिस्थितीत निवडणूक आयोग लोकांना सण साजरे करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेऊन मतदानाचे वेळापत्रक ठरवणार आहे.

दरम्यान, मे महिन्याच्या सुरुवातीला निवडणूक आयुक्त विवेक जोशी पाच दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांनी ईव्हीएम/व्हीव्हीपॅटच्या पहिल्या स्तरावरील तपासणी (एफएलसी) केंद्रांचा आढावा घेतला. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतही त्यांनी बैठक घेतली. मतदानाचा टक्का वाढवण्यावर त्यांनी भर दिला. निवडणूक काम निष्पक्ष आणि वेळेवर पार पाडण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि जास्तीत जास्त सहभागाने करण्यावर भर देण्यात आला. सर्व सहभागी पक्षांच्या सक्रिय सहभागासाठी प्रशासनाने रचनात्मक पुढाकार घ्यावा असे सांगितले.

यापूर्वी २०२० ची बिहार विधानसभा निवडणूक २८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यात झाली होती. त्यावेळी पहिल्या टप्प्यात ७१ जागांवर, दुसऱ्या टप्प्यात ९४ जागांवर आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान झाले होते; तर १० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता.
Powered By Sangraha 9.0