हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी! शिवसेनेचं व्यंगचित्र व्हायरल; ठाकरेंना डिवचलं
19-Jun-2025
Total Views | 29
मुंबई : शिवसेनेच्या दोन्ही पक्षांकडून वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्याआधीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एक व्यंगचित्र चांगलेच व्हायरल होत आहे. या व्यंगचित्रातून हिंदूत्वाच्या मुद्दयावरून उबाठा गटाला डिवचल्याचे सांगण्यात येत आहे.
गुरुवार, १९ जून रोजी शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही आपापल्या पक्षांचे मेळावे घेणार आहेत. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही मेळाव्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
परंतू, त्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेकडून सोशल मिडीयावर एक व्यंगचित्र शेअर करण्यात आले आहे. यात हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, असा मजकूर असून एकनाथ शिंदेंच्या हातात भगवा झेंडा तर त्यांच्या बाजूला वाघाचे छायाचित्र आहे. दरम्यान, हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, असे म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
संध्याकाळी ५.०० वरळीतील एन.एस.सी.आय. डोम सभागृहात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तर सायंकाळी ६.०० वाजता सायनमधील श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृहात उद्धव ठाकरेंच्या पक्षातर्फे वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.