मुंबई : शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन असून दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे मेळावे घेण्यात येणार आहे. गुरुवार, १९ जून रोजी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. दरम्यान, या मेळाव्यात दोन्ही पक्ष महापालिका निवडणूकांचे रणशिंग फुंकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उबाठा गट गुरुवारी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. संध्याकाळी ५.०० वरळीतील एन.एस.सी.आय. डोम सभागृहात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तर सायंकाळी ६.०० वाजता सायनमधील श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृहात उद्धव ठाकरेंच्या पक्षातर्फे वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.
दोन्ही पक्षांकडून वर्धापन दिन सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबईत ठिकठिकाणी दोन्ही पक्षांचे बॅनर झळकत आहे. तसेच या मेळाव्याचे टीझरही जारी करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत काही पक्षप्रवेश होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.