
पुणे, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या उद्या पुण्यात आगमन करणार असून, २१ जून रोजी पुण्यात त्यांचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर २३ जून ते १ जुलै २०२५ या कालावधीत दोन्ही पालख्या ग्रामीण भागातील नियोजित मार्गांवर प्रस्थान करतील.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुणे–सासवड–लोणंद मार्गे पंढरपूरकडे जाईल, तर श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे–सोलापूर मार्गे रोटी घाट, चारमाठी, इंदापूर, अकलूज मार्गे पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
या कालावधीत पालखी मार्गावरील वाहतूक नियोजनबद्ध पद्धतीने पर्यायी मार्गांनी वळवण्यात येणार असून, नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालखी मार्गावरील हॉटेल्स, ढाबे आणि अन्न विक्री केंद्रांवर मांसाहार आणि मद्यविक्रीवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस दलाने सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत आवश्यक नियोजन सुरू केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.
या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी पालखी मार्गावरील सुरक्षाव्यवस्था, वाहतूक नियंत्रण, सामाजिक शिस्त व धार्मिक भावना यांचा आदर राखून कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले.पालखी मार्गावरील स्थानीय नागरिक व भाविकांनी वाहतूक मार्गातील बदलांची माहिती ठेवून, प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.