डोंबिवली : अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेली डोंबिवलीची रहिवासी हवाई सुंदरी रोशनी सोनघरे हिला साश्रुनयनांनी गुरूवारी अखेरचा निरोप दिला. आपल्या पोटच्या लेकराला अखेरचा निरोप देताना आईचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. लेकीला अखेरचा निरोप देऊन परतत असताना आईला भोवळ आली.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या हवाई सुंदरी रोशनी हिचे पार्थिव डोंबिवलीतील राजजी पथ परिसरातील न्यू उमिया सोसायटीत गुरूवारी आणण्यात आले. एअर इंडियाच्या विशेष विमानाने पार्थिव मुंबई विमानतळावर आले. गुरूवारी सकाळी नऊ वाजता तिचे पार्थिव राहत्या घरी पोहोचले. रोशनीचे पार्थिव डोंबिवलीत आणताच सर्वांच्याच अश्रुचा बांध फुटला. तिच्या राहत्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी काही वेळ ठेवण्यात आले होते. तेव्हा कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, एअर इंडियाचे अधिकारी-कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. फुलांनी सजवलेल्या स्वर्गरथातून रोशनीचा अंत्ययात्रा काढण्यात आली.
रोशनी आई राजश्री, वडील राजेंद्र आणि भाऊ विघ्नेश यांच्यासह डोंबिवलीत राहत होती. मुंबई ग्रॅड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षापूर्वी डोंबिवलीत स्थायिक झाले होते. रोशनी हिचा भाऊ र्मचट नेव्ही मध्ये आहे. रोशनीचा प्रवास दहा बाय दहाच्या छोटय़ाशा घरातून सुरू झाला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रोशनीच्या आईवडीलांनी दोन्ही भावंडांना चांगले शिक्षण दिले होते. रोशनीला लहानपणापासूनच एअर कू बनायचे होते. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत तिने स्वप्नाच्या दिशेने भरारी घेतली. अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या दोन दिवस आधीच रोशनी आपल्या मूळ गावी जाऊन आली होती. तिथे तिने आपल्या आजी-आजोबाची आणि इतर नातेवाईकांची भेट घेतली. कुलदेवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर तिला अहमदाबाद फ्लाईंटची पहिलीची ड्युटी लागली होती. रोशनी लवकरच विवाहबंधनात अडकणार होती. नोव्हेंबरमध्ये साखरपुडा आणि पुढील वर्षी मार्चमध्ये लग्न करण्याचा त्यांचा मानस होता. रोशनी ही मनमिळाऊ स्वभावाच्या असून इन्स्टाग्रामवर 54 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. तिला विमान प्रवासाची आणि विविध देशांना भेट देण्याची आवड होती. यापूर्वी ती स्पाईस जेट या विमान कंपनीत कार्यरत होती. दोन वर्षापूर्वीच ती एअर इंडियामध्ये रूजू झाली होती. गावावरून आल्यानंतर आई-वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली. अहमदाबादच्या फ्लाईटने ती लंडनच्या दिशेने निघाली होती मात्र नियतीने घाला घातला. या विमानाला अपघात झाला. त्यात रोशनीचा दुदैवी मृत्यू झाला.
डीएनए चाचणीनंतर ओळख, पार्थिव कुटुंबाच्या स्वाधीन
अपघाताची भीषणता इतकी होती की, विमानातील मृतदेहांची ओळख पटवणे ही कठीण झाले होते. रोशनीच्या कुटुंबियांची डीएनए चाचणी केल्यानंतर तिच्या मृतदेहाची ओळख पटली. अपघाताची माहिती मिळताच रोशनीचे वडील राजेंद्र सोनघरे आणि भाऊ विघ्नेश हे अहमदाबादला रवाना झाले होते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुधवारी रोशनीचे पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.
रोशनीला अखेरचा निरोप देण्यासाठी
कुटुंबीय, नातेवाईक यांच्यासह भाजपाचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक मंदार हळबे, मुंकुंद पेडणेकर, मितेश पेणकर, शिवसेना आमदार राजेश मोरे,गजानन व्यापारी, एअर इंडियाचे एन.जे. जुली, टाटा सन चे सीएफओ सौरभ अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.