अहिल्यानगर : शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिर परिसरातील ‘अब्दुल बाबा दर्गा’ या धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापनावर आणि त्या दर्ग्याच्या खासगी नियंत्रणावर सकल हिंदू समाज, अहिल्यानगर यांच्यावतीने शिर्डी मंदिर प्रशासन संस्थेवर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रीय श्रीराम संघ या संघटनेने यासंदर्भात अधिकृत पत्र शिर्डी साई संस्थान व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करून लिखित मागणी केली आहे की, अब्दुल बाबा दर्गा संस्थानच्या अखत्यारीत आणण्यात यावा, अन्यथा आंदोलन अटळ आहे.
हा दर्गा संस्थानच्या जागेवर असूनही खासगी मुस्लिम कुटुंबाच्या ताब्यात कसा गेला, त्याचा लेखाजोखा अद्याप संस्थानकडून दिला गेलेला नाही. हे लक्षात घेता लाखो साईभक्तांच्या सर्वधर्मसमभावाने दिल्या जाणाऱ्या दानाचा गैरवापर होत असल्याची संतप्त भावना हिंदू समाजात पसरली आहे.
दिनांक १४ जून रोजी शनिशिंगणापूर येथे सकल हिंदू समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात “शनिशिंगणापूर तो झाकी है, शिर्डी अभी बाकी है” या घोषणांनी परिसर दणाणून गेला. युवा आमदार संग्रामदादा जगताप, हिंदुत्ववादी नेते राष्ट्रीय श्रीराम संघ अध्यक्ष सागर भैय्या बेग व भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्या नेतृत्वात हा मोर्चा पार पडला.
यावेळी आंदोलकांनी शिर्डी संस्थान प्रशासनावर गंभीर आरोप केले. लाखो साईभक्तांचे दान, एक खासगी मुस्लिम कुटुंब दर्ग्यासाठी वापरत असेल, तर हे श्रद्धेचे अपवित्रिकरण आणि हिंदू समाजाच्या आत्मगौरवावरचा आघात असल्याचे ठणकावून सांगितले.
तसेच शनिशिंगणापूर मंदिरात पूर्वी ११४ मुस्लिम कामगारांची नेमणूक आणि महत्त्वाची कंत्राटे मुस्लिम ठेकेदारांना देण्यात आल्यामुळे निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा उभा राहिला होता. मोर्चाच्या दबावामुळे संबंधित मुस्लिम कामगारांना कामावरून हटवले गेले; मात्र एकपक्षीयतेचा आरोप टाळण्यासाठी ५० पेक्षा जास्त हिंदू कामगारांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
सागर बेग यांनी या प्रकारात माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप करत, मंदिर प्रशासनात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदू श्रद्धेचा अवमान सुरू असल्याचे म्हटले. “हिंदूचं दान हिंदू सत्कर्मासाठी लागलं पाहिजे. अब्दुल बाबा दर्ग्यावर खासगी लोकांचा ताबा असणे चुकीचं आहे. संस्थानने त्वरित यावर कारवाई करावी,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष आकाश अशोक बेग आणि सागर अशोक बेग यांच्या सह्यांनी युक्त असलेले पत्र संस्थानला देण्यात आले असून, जर शिर्डी प्रशासनाने ही चूक सुधारली नाही, तर उग्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
खासगी ताबा हटवा, अन्यथा तीव्र आंदोलन
"अब्दुल बाबा दर्गा संस्थानच्या जागेवर असूनही त्याचे खासगी मुस्लिम कुटुंबाकडे नियंत्रण असणे हे लाखो साईभक्तांच्या श्रद्धेवरचा थेट घात आहे. दानाचे बाजारीकरण आणि धर्माच्या नावावर चाललेला हा प्रकार हिंदू समाजाला मान्य नाही. ही चूक संस्थानने तात्काळ दुरुस्त करावी. अन्यथा सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि समाजाच्या वतीने शनिशिंगणापूरसारखंच तीव्र आंदोलन शिर्डीत उभारण्यात येईल,".
— सागर बेग,
हिंदुत्ववादी युवा नेते अहिल्यानगर
राष्ट्रीय श्रीराम संघ अध्यक्ष
शिर्डी संस्थानाने ही चूक तात्काळ दुरुस्त करावी — आमदार संग्रामदादा जगताप
"शिर्डी साई संस्थानच्या परिसरात असलेल्या अब्दुल बाबा दर्ग्याच्या खासगी नियंत्रणावर गंभीर प्रश्न उपस्थित आहेत. लाखो साईभक्तांचे दान एका कुटुंबाच्या ताब्यात का?त्या दानाचा उपयोग लोकाभिमुख कामासाठी का वापरत नाही? हे उत्तर मिळालंच पाहिजे. शिर्डी संस्थानाने ही चूक तात्काळ दुरुस्त करावी, अन्यथा शिर्डीमध्येही शनिशिंगणापूरसारखं तीव्र आंदोलन होणारच, असा स्पष्ट इशारा मी देतो."