
मुंबई : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) नवीन मंडळ कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात सकारात्मक विचार करणार असल्याचे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी गुरुवार, १९ जून रोजी सांगितले. महावितरण मंडळ कार्यालय स्थापन करण्यासाठी उर्जा विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिनिधी महावितरण कंपनीचे संचालक प्रदीप भागवत, महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि भुसावळ विभागातील स्थानिक उर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, "भुसावळ शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता वीज पुरवठा योग्य प्रकारे आणि वेळेवर होणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार आणि क्षेत्राच्या गरजेनुसार वीज पुरवठा सुनिश्चित करण्यात यावा."
"स्थानिक वीजपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर अभ्यास करून समस्या क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष पाहाव्यात. लोकांच्या अडचणी समजून घेत ठोस उपाययोजना कराव्या." असे निर्देश त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच महावितरणच्या नवीन मंडळ कार्यालयामुळे भुसावळसह परिसरातील वीज सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम आणि ग्राहकाभिमुख होईल," असा विश्वासही मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला.