चौकशी समितीचा अहवाल आला! न्यायामूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका? महाभियोग प्रस्ताव मांडला जाणार?

19 Jun 2025 16:17:19

नवी दिल्ली(Justice Yashwant Verma):दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायामूर्ती यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानी लागलेल्या आगीत सापडलेल्या जळालेल्या नोटांच्या बंडलांमुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. न्यायामूर्ती वर्मा यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन न्यायाधीशांच्या समितीने ६४ पानांच्या अहवालामधून ५५ हून अधिक पुरावे आणि जबाब न्यायालयासमोर सादर केले. त्यानंतर तो सार्वजनिकरित्या प्रकाशित करण्यात आला.

१४ मार्च रोजी रात्री ११:३५ वाजता न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानी लागलेली आग ही संशयाच्या केंद्रस्थानी होती. ही आग जाणूनबुजून लावली गेली? की लागली गेली? न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरात एवढे पैसे आले कुठून? हे सर्व प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित केल्यानंतर तत्कालीन सरन्यायधीश संजीव खन्ना यांनी चौकशी करण्यासाठी तीन न्यायाधीशांची समिती नेमली होती.

या न्यायाधीशांच्या चौकशी समितीने आपल्या अहवालात न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या प्रत्येक विधानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले, जेणेकरून नंतर अहवालावर संशय व्यक्त केला जाऊ नये.

समितीचा अहवाल काय म्हणतो?
समितीने अहवालात म्हटले की, "रेकॉर्डवरील प्रत्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे लक्षात घेता, ही समिती ठामपणे असे मानते की सरन्यायाधीशांनी दि. २२ मार्च रोजी लिहिलेल्या पत्रात उपस्थित केलेल्या आरोपांमध्ये पुरेसे तथ्य आहे आणि सिद्ध झालेले गैरवर्तन यशवंत वर्मा यांना पदावरून काढून टाकण्याची कार्यवाही सुरू करण्याची मागणी करण्यासाठी पुरेसे गंभीर आहे.”

पुढे समिती म्हणते की, स्टोर रूममधील आग विझवण्याच्या प्रक्रियेत सापडलेल्या अर्धवट जळालेल्या नोटा अत्यंत संशयास्पद आहेत, आणि ह्या नोटा स्टोर रूममधून हलवण्याचे काम न्यायमूर्ती वर्मा किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या सहमतीने झाले. “न्यायमूर्ती वर्मा आणि त्यांच्या पत्नी सुट्टीसाठी दिल्लीच्या बाहेर असल्याने, संबंधित वेळी दरवाजा बंद आणि सुरक्षित ठेवण्यात आला होता.” न्यायाधीशांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांपैकी काही जणांनी समितीला सांगितले की, त्यांनी स्टोअर रूमचा दरवाजा नेहमीच कुलूपबंद केलेला पाहिला आहे, असे अहवालात म्हटले आहे.

“महात्मा गांधी मैं आग लग रही है.”
समितीला चौकशीमध्ये आढळून आले की एका व्हिडिओ मध्ये “महात्मा गांधी मैं आग लग रही है” हा आवाज साक्षीदार क्रमांक ६, जो दिल्ली अग्निशमन सेवांचे स्टेशन ऑफिसर मनोज मेहलावत यांचा होता, याचा अर्थ असा की तिथे मोठ्या प्रमाणात नोटांचे गठ्ठे जळत होते.

आता न्यायमूर्ती वर्माकडे कोणते पर्याय आहेत?
या समितीच्या अहवालातून स्पष्ट होते की, न्यायमूर्ती वर्मा यांच्या निवासस्थानी जळालेल्या नोटांचे मोठ्या प्रमाणात गठ्ठे सापडले, ते सर्व पैसे लपवण्याचा प्रयत्न न्यायमूर्ती वर्मा तसेच त्यांच्या परिवाराकडून झाला. समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केला. न्यायमूर्ती वर्मा यांची बदली जरी अलाहाबाद उच्च न्यायालयात झाली असली तरी त्यांना कोणतेही न्यायालयीन काम देण्यात आलेले नाही, त्यांनी निर्दोष असल्याचा दावा केला आहे. त्यांनी आतापर्यंत राजीनामा देण्यास किंवा स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय निवडण्यास नकार दिला आहे. त्यांच्यावरील कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सध्या केंद्र सरकारने न्या. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्तावाची तयारी सुरू केली आहे. महाभियोगापूर्वी न्यायमूर्ती वर्मा राजीनामा किंवा स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय निवडणार का, हे पाहणे म्हत्त्वाचे ठरेल.



Powered By Sangraha 9.0