मुंबई विमानतळानजीकची बेकायदा बांधकामे हटवणार! उच्च न्यायालयाने दिले आदेश

19 Jun 2025 19:19:29

मुंबई(CSMI Airport Mumbai): अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडिया फ्लाइट AI171 च्या भीषण अपघातात जवळपास २७४ नागरिक मृत्यूमुखी पडले होते. हा अपघात विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे झाला असला, तरी ते विमान ज्या प्रकारे वसतिगृहाच्या इमारतीवर आदळले होते, त्याचा विध्वंस पाहून यशवंत शेणॉय यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर कुर्ल्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी, दि. १८ जून रोजी उच्च न्यायालयाला सांगितले की, उड्डाणांसाठी अडचण निर्माण करणाऱ्या सात इमारतींविरूध्द कारवाई केली आहे.

यशवंत शेणॉय यांनी भारतीय विमानपतन प्राधिकरण अधिनियम १९९४ मधील तरतुदींचे पालन करून इमारती, झाडे आणि इतर बाबींमुळे निर्माण होणारे अडथळ्यांबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने सुनावणी करत असताना शेणॉय यांनी प्रशासनाने आतापर्यत कुठलीही कारवाई केली नसल्याचे सांगितले.

यशवंत शेणॉय २०२२ मध्ये याच मुद्द्यांसह न्यायालयात धाव घेतली होती. मार्च २०२५ मध्ये उच्च न्यायालयाने विमान प्राधिकरणाला याचिका लवकरात लवकर निकाली काढण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने जिल्हाधिकारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फैज ऑलविन अपार्टमेंट्स सीएचएसएल, फजल हाऊस सीएचएसएल आणि फरजान अपार्टमेंट सीएचएसएल यांनी बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामे हटवण्याचे निर्देश दिले होते. पण सर्व बेकायदेशीर बांधकामाच्या याचिका जिल्हाधिकारी आणि विमान प्राधिकरणासमोर प्रलंबित आहे.

यावर उच्च न्यायालयाने विमान प्राधिकरणाला आणि कुर्ल्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना विचारला असता, त्यांनी सांगितले की त्या क्षेत्रातील सुमारे ७ इमारती पाडण्यात आल्या आहेत, मोबाईल अँटेना टॉवरची उंची कमी करण्यात आली आहे आणि पुढील कारवाईदेखील करू, असे न्यायालयात म्हटले आहे.



Powered By Sangraha 9.0