मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

19 Jun 2025 15:04:46

Tribute to Maruti Chitampally
 
मुंबई : निसर्गाला शब्दरूपांनी साजिवंत करणारे आणि मराठी साहित्यात निसर्गसंपदे विषयीच्या अक्षरधनाची भर घालून, आपली साहित्य संपदा समृद्ध करणारे अरण्यऋषी म्हणून पद्मश्री मारूती चितमपल्ली अजरामर राहतील, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. निसर्ग आणि साहित्य क्षेत्रात व्रतस्थ राहून काम करणारे चितमपल्ली यांचे निधन महाराष्ट्रासाठी एक मोठी हानी आहे, त्यांच्या निधनाने एक दिपस्तंभ निमाला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अर्पण केली आहे.
 
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, वन विभागात काम करताना चितमपल्ली यांनी आगळा दृष्टीकोन बाळगून काम केले. त्यांनी अनेक निसर्ग किमया आपल्या निरिक्षणातून शब्दांनी चितारल्या. त्यासाठी त्यांनी गाढा अभ्यासही केला. आदिवासी तसेच राना-वनात राहणाऱ्या बांधवांकडे असलेले निसर्गाविषयीचे ज्ञान त्यांच्यामुळेच शब्दबद्ध झाले. पक्षितज्ज्ञ, निसर्गलेखक, वन्यजीवांचा अभ्यासक अशी त्यांनी ओळख मिळवली. त्यांच्यामुळे मराठी भाषेला राना-वनातील, निसर्गाशी निगडीत अस्सल असे शब्द मिळाले. त्यांच्या आत्मचरित्राचे नावच चकवाचांदण- एक वनोपनिषद असे होते. त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी संस्कृतचाही अभ्यास केला. सोलापुरला झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. दिवंगत चितमपल्ली यांचे कुटुंबिय आणि स्नेही यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना, असे नमूद करून, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक, अरण्यऋषी, पद्मश्री मारूती चितमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
 
त्यांचे निसर्गाविषयीचे लेखन, अभ्यास- संशोधन, पक्षिकोश अशी साहित्य संपदा मराठी भाषेचे वैभव वाढणारे संचित आहे. ही आपल्या सर्वांसाठी एक अमुल्य असा ठेवा आहे. दिवंगत चितमपल्ली यांचा सोलापूर ते नागपूर आणि पुन्हा नागपूर ते सोलापूर असा प्रवास राहीला आहे. विदर्भातही त्यांचा मोठा गोतावळा आहे. जंगलातील अनेकांशी त्यांचे ऋणानुबंध राहीले आहेत. या सगळ्या प्रवासात ते आयुष्यभर निसर्ग आणि मराठी साहित्य क्षेत्राशी व्रतस्थ राहीले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील निसर्ग अभ्यासक, तसेच साहित्य क्षेत्रासाठीचा दिपस्तंभ निमाला आहे, ही एक मोठी हानी आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0