तिसऱ्याची मध्यस्थी नकोच; ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले ; पंतप्रधान मोदींची फोनवर 35 मिनिटे चर्चा ; गोळीचे उत्तर तोफेच्या गोळ्यानेच देणार

    19-Jun-2025
Total Views |

Prime Minister Modi and donald trump
 
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, दि. 18 जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सुमारे 35 मिनिटे दूरध्वनीवर संवाद साधला. या संवादादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ची सविस्तर माहिती दिली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. मिस्री यांनी स्पष्ट केले की, “या संपूर्ण प्रक्रियेत भारत-अमेरिका व्यापार करार किंवा मध्यस्थीविषयी कुठेही कोणतीही चर्चा झाली नाही. सैन्य कारवाई थांबविण्याविषयी चर्चा थेट भारत आणि पाकिस्तानमधील विद्यमान लष्करी अधिकार्‍यांमार्फत झाली होती आणि ती पाकिस्तानच्या विनंतीवरून झाली होती.” तसेच, पंतप्रधान मोदी यांनी यावेळी पुन्हा स्पष्टपणे सांगितले की, “भारताने कधीही कोणत्याही तिसर्‍या पक्षाच्या मध्यस्थीला मान्यता दिलेली नाही आणि भविष्यातही देणार नाही.”
 
पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले की, “भारत आता दहशतवादी घटनांकडे ‘प्रॉक्सी वॉर’ म्हणून न पाहता, थेट युद्धाच्या स्वरूपात पाहणार आहे.” ‘ऑपरेशन सिंदूर’ आजही सुरू आहे. परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांनी मांडलेल्या मुद्द्यांना समजून घेतले आणि भारताच्या दहशतवादाविरोधी लढ्याला पाठिंबा दर्शवला.”
 
गोळीचे उत्तर तोफेच्या गोळ्याने
 
पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितले की, “दि. 22 एप्रिल रोजीनंतर भारताने दहशतवादाविरोधात कारवाई करण्याचा निश्चय जगासमोर मांडला होता. दि. 6 व दि. 7 मे रोजीच्या रात्री भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील केवळ दहशतवादीतळांवर हल्ले केले होते. भारताची कारवाई ही अतिशय अचूक आणि संघर्षाची व्याप्ती टाळणारी होती. पाकिस्तानच्या गोळीचे प्रतिउत्तर आम्ही तोफेच्या गोळ्याने देऊ.”
 
मिस्री यांनी पुढे सांगितले की, “दि. 9 मे रोजीच्या रात्री अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींना दूरध्वनी केला होता. त्यांनी सांगितले की, पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करू शकतो. यावर पंतप्रधान मोदींनी त्यांना स्पष्ट सांगितले की, जर तसे झाले, तर भारत त्याहूनही मोठे प्रत्युत्तर देईल. दि. 9 व दि. 10 मे रोजीच्या रात्री भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर दिले आणि त्यांची लष्करी हानी मोठ्या प्रमाणात झाली. पाकिस्तानच्या एका लष्करी हवाईतळाला निष्क्रिय करण्यात आले. भारताच्या या निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानला सैन्य कारवाई थांबविण्याची विनंती करावी लागली.”
 
‘क्वाड’च्या बैठकीसाठी ट्रम्प भारतात येणार
 
मिस्री यांनी सांगितले की, “मोदी आणि ट्रम्प यांनी इस्रायल-इराण संघर्षाविषयीदेखील चर्चा केली. रशिया-युक्रेन युद्धाविषयी दोघांमध्ये सहमती झाली की, शांततेसाठी थेट संवाद आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रयत्न सुरू ठेवायला हवेत. पंतप्रधान मोदींनी ‘क्वाड’च्या पुढील बैठकीसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले, जे त्यांनी स्वीकारले आणि भारत भेटीसाठी उत्सुक आहेत,” असे सांगितले.
 
‘जी-7’ परिषदेदरम्यान भेट का झाली नाही?
 
मोदी आणि ट्रम्प यांची भेट ‘जी-7’ परिषदेदरम्यान होणार होती. मात्र, दि. 17 जून रोजी ट्रम्प यांना अमेरिकेत परतावे लागल्याने ही भेट होऊ शकली नाही. यानंतर ट्रम्प यांच्या विनंतीवरून दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीवर संवाद झाला. ही संवाद सुमारे 35 मिनिटे चालला. दि. 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी मोदींना दूरध्वनी करून संवेदना व्यक्त केल्या होत्या. दि. 18 जून रोजी पहिल्यांदा या दोघांमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी अधिकृत चर्चा होती.