Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात 'ब्लॅक बॉक्स'चेही नुकसान! डेटा रिकव्हर करण्यासाठी अमेरिकेत पाठवणार?

19 Jun 2025 16:59:19

India to send black box of crashed Air India 787 aircraft to US for data recovery
 
नवी दिल्ली : (Air India Plane Crash) एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनला निघालेल्या AI 171 बोइंग ड्रीम लायनर 787 या विमानाचा १२ जून रोजी भीषण अपघात झाला होता. उड्डाणानंतर अवघ्या मिनिटांतच ते विमानतळाजवळील नागरी परिसरात कोसळले. या अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील माहितीचा उलगडा होणे गरजेचे आहे. मात्र भीषण स्फोटात ब्लॅक बॉक्सचे बरेच नुकसान झाल्यामुळे भारतात त्याच्यातील माहिती मिळवणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता हा ब्लॅक बॉक्स विश्लेषणाकरिता अमेरिकेत पाठविला जाणार आहे.
 
अमेरिकेतील वॉशिंग्टनच्या प्रयोगशाळेत ब्लॅक बॉक्सचे विश्लेषण केल्यानंतर त्यातून मिळालेली माहिती भारतीय विमान अपघात तपास संस्थेकडे (AAIB) सोपवली जाईल. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार ज्या देशात विमान अपघात घडला, त्याच देशाकडे अपघाताच्या तपासाचे नेतृत्व असते. या नियमानुसार प्रयोगशाळेचा अहवाल भारतीय तपास संस्थेकडे सुपूर्द केला जाईल.
 
एएआयबीने दिल्ली येथे गेल्याच वर्षी प्रयोगशाळा स्थापन केली होती. मात्र ब्लॅक बॉक्सचे खूपच नुकसान झाल्यामुळे त्यातून माहिती मिळविण्यासाठी प्रयोगशाळा अद्याप तितकी सुसज्ज नाही. माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, भारतातील अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अमेरिकेचे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेतील प्रयोगशाळेत घेऊन जाईल.
 
 
Powered By Sangraha 9.0