नवी मुंबई मेट्रो लाईन १वर क्यूआर तिकीट प्रणाली सुरू

18 Jun 2025 20:11:22


मुंबई
 : कॉमन मोबिलिटी सोल्युशनच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, सिडकोने नवी मुंबई मेट्रो लाईन १वर पेपर क्यूआर तिकीट प्रणाली यशस्वीपणे सुरू केली आहे. ही नाविन्यपूर्ण तिकीट प्रणाली ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन प्रणालीचे अद्ययावतीकरण करून साकारण्यात आली आहे, जे नव्या गरजांना पूरक आहे.

मंगळवार, दि. १७ जून रोजी या प्रणालीचे उद्घाटन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. क्यूआर आधारित तिकीट प्रणालीची बेलापूर मेट्रो स्थानकावर अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांना जलद, सुलभ व सुरळीत प्रवास अनुभव प्रदान करणे हा आहे.

प्रवाशांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी सिडकोतर्फे भविष्यात लवकरच आणखीन काही नवीन सुविधा देखील समाविष्ट केल्या जाणार आहेत. यामध्ये मोबाईल तिकीटिंग अ‍ॅपचा समावेश आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून भविष्यात प्रवाशांना मेट्रोची तिकीटे खरेदी करता येतील. आगामी व्हॉट्सॲप आधारित तिकीट सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना थेट व्हॉट्सॲपद्वारे तिकीटे खरेदी करता येतील. तर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड च्या माध्यमातून भविष्यात एकसंध पेमेंट सोल्युशन अंतर्गत विविध वाहतूक सेवा एकत्रितपणे वापरता येऊ शकतील. या सर्व सुविधा लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती सिडकोने दिली. ही क्यूआर आधारित तिकीट प्रणाली मेसर्स औरियनप्रो सोल्युशन्स प्रा.लि. यांनी तयार केली असून, सिडको आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. यांच्या देखरेखीखाली यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0