'चला हवा येऊ द्या' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला; नव्या दमाचा तडका, पण काही जुने चेहरे गायब!

18 Jun 2025 17:52:01



let the wind come to meet the audience once again


मुंबई : मराठी प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसलेला विनोदी कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' आता पुन्हा नव्या रूपात परतणार आहे. काही काळासाठी विश्रांती घेतलेला हा शो आता नवीन जोशात आणि थोड्या बदलांसह पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. मात्र, यावेळी काही जुन्या चेहऱ्यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे.

सूत्रांनुसार, या नव्या पर्वात श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके आणि गौरव मोरे हे मुख्य कलाकार म्हणून दिसणार आहेत. हे सर्व कलाकार प्रेक्षकांचे लाडके असून, त्यांच्या विनोदी अंदाजाने पुन्हा एकदा हास्याचा पाऊस पाडण्याची शक्यता आहे. पण या नव्या पर्वात डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम आणि सागर कारंडे हे प्रेक्षकप्रिय चेहरे दिसणार नाहीत, ही गोष्ट अनेकांना खटकतेय. सोशल मीडियावर याबाबत चर्चाही रंगत आहे. हाच त्रिकूट मागील अनेक वर्षं या कार्यक्रमाची ओळख ठरले होते.


नव्या चेहऱ्यांना संधी आणि नव्या लेखकांची साथ
या पर्वामध्ये केवळ कलाकारच नव्हे, तर लेखक आणि दिग्दर्शक मंडळीतही नवे चेहरे दिसणार आहेत. योगेश शिरसाट यांच्यासह काही नवोदित लेखक या शोमध्ये योगदान देणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध शहरांमधून (मुंबई, पुणे, कोल्हापूर, संभाजीनगर) निवड झालेले नवे हास्यकलाकार यंदाच्या पर्वात सहभागी होतील. या कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी मूळ टीममधील श्रेया, कुशल, भारत आणि गौरव यांची महत्त्वाची भूमिका असेल.


निलेश साबळेंच्या अनुपस्थितीमागचं कारण काय?
डॉ. निलेश साबळे यांनी मागील वर्षीच दुसऱ्या वाहिनीवरील एका कार्यक्रमासाठी ‘चला हवा येऊ द्या’ सोडलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की शो काही काळासाठी बंद होणार असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा नवा शो फार काळ टिकला नाही. आता ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा नव्याने सुरू होत असला तरी निलेश, भाऊ आणि सागर यांची पुन्हा एन्ट्री होईल का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. नव्या दमाच्या टीमसोबत हा शो तितकाच यशस्वी होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


Powered By Sangraha 9.0