वॉशिंग्टन : (Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बुधवार, दि. १८ जून रोजी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची भेट घेणार आहेत. व्हाईट हाऊसने बुधवारी जाहीर केलेल्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दैनंदिन वेळापत्रकात म्हटले आहे की, ते आज कॅबिनेट रूममध्ये पाकिस्तानी जनरल असीम मुनीर यांच्यासोबत दुपारच्या जेवणादरम्यान भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये दोन्ही देशांमधील संबंध, प्रादेशिक सुरक्षा आणि इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः इस्त्रायल-इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
माहितीनुसार, असीम मुनीर हे सध्या पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. मुनीर त्यांच्या अमेरिका दौऱ्यात परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांचीही भेट घेणार आहेत. अमेरिकेसोबतचे धोरणात्मक संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर रविवारी पाच दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले आहेत. ही भेट प्रामुख्याने द्विपक्षीय स्वरूपाची असल्याची माहिती माध्यमांमधून समोर आली आहे. याआधी अमेरिकेने असीम मुनीर यांना २५० व्या 'आर्मी डे'च्या परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याच्या बातम्या पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. मात्र नंतर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने हे दावे अधिकृतपणे फेटाळून लावले. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "हे वृत्त खोटे आहे. कोणत्याही परदेशी लष्करी नेत्याला आमंत्रित करण्यात आले नव्हते."
दौऱ्यादरम्यान मुनीर यांना सोमवारी अमेरिकेतील पाकिस्तानी नागरिक आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ कार्यकर्त्यांकडून निषेधाचा सामना करावा लागला. त्यांच्या विरोधात अमेरिकेत घोषणाबाजी करण्यात आली. सोमवारी, जेव्हा वॉशिंग्टन डीसीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे स्वागत केले जात होते, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी "असीम मुनीर, तुम्ही भित्रे आहात, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, 'पाकिस्तानींचे मारेकरी', 'इस्लामाबादचा कसाई', 'सामूहिक मारेकरी' अशा घोषणा देताना दिसत आहेत.लोकांमध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड संताप होता. असीम मुनीर यांच्या विरोधात निदर्शनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही पाकिस्तानी नागरिक मुनीर थांबलेल्या हॉटेलसमोर निदर्शनांसाठी जमले होते. वाहनांवर प्रोजेक्टर लावून मुनीर यांना 'सामूहिक मारेकरी' असे नाव त्यांनी दिले होते. असीम मुनीर एका इमारतीतून बाहेर पडत होते, त्याचवेळी यांच्यासमोर संतप्त पाकिस्तानी निदर्शकांनी ही घोषणाबाजी केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, निदर्शक अधिकाऱ्यांशी वाद घालतानाही दिसत आहेत.