गांधीनगर(Ahmedabad plane crash): अहमदाबादहून लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 विमानाचा दि. १२ जून रोजी अहमदाबाद विमानतळाजवळ दुर्दैवी अपघात झाला होता. या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. यात २७४ नागरिकांचा मृत्यू झाला. अपघातानंतर लगेचच, टाटा ग्रुपने एक्स या समाजमाध्यमावर अधिकृत घोषणा करत अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत तसेच जखमी झालेल्यांसाठी वैद्यकीय खर्चाची भरपाई केली जाईल, असे जाहीर केले होते.
या अपघातानंतर काही डॉक्टरांनी भारताचे सरन्यायाधीश यांना एक पत्र लिहिले, त्या पत्रात त्यांनी पीडितांच्या कुटुंबांना त्वरित आणि योग्य भरपाई मिळावी यासाठी केंद्र सरकारला स्पष्ट निर्देश देण्याची विनंती केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने अपघाताच्या चौकशीसंदर्भात एक समिती नेमली आणि त्वरीत भरपाई दिली जाईल, असे आश्वासन दिले.
भरपाईबद्दल कायदा काय म्हणतो?
जेव्हा विमान अपघात होतो तेव्हा मृत्युमुखी पडलेल्याला आणि त्यांच्या कुटुंबियांना आंतरराष्ट्रीय आणि भारतीय कायद्यानुसार, भरपाई मिळण्याची तरतूद आहे.
मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन, १९९९
या कायद्यात प्रवाशांना मृत्यु किंवा दुखापत झाल्यास तसेच सामानाचा विलंब, मालाचे नुकसान झाल्यास किंवा इतर संबंधित घटनांबाबत विमान कंपन्यांची जबाबदारी निश्चित केली आहे.
हा कायदा विमान उड्डाण करता वेळेस किंवा उतरताना अपघात झाला आणि त्यात प्रवाशाचा मृत्यू किंवा शारीरिक दुखापत झाल्यास, झालेल्या नुकसानासाठी वैमानिक जबाबदार असतो. या कायद्यातील तरतुदीनुसार, अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात वैमानिकही मृत पावल्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी एअर इंडिया एअरलाइन पूर्णपणे जबाबदार आहे.
हवाई वाहतूक कायदा, १९७२
हा कायदा केंद्र सरकारला मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन, १९९९ च्या तरतुदी देशांतर्गत वाहतुकीसाठी लागू करण्याचा अधिकार देतो. या कायद्यात २००९ साली करण्यात आलेल्या सुधारणेअंतर्गत, प्रवासी देशांतर्गत प्रवास करत असो किंवा आंतरराष्ट्रीय उड्डाण, सगळ्यांनाच एकसमान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
एस अब्दुल सलाम विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्यात केरळ उच्च न्यायालयाने म्हटले की, “आंतरराष्ट्रीय उड्डाणे, किंवा देशांतर्गत उड्डाणात अपघात झाला आणि त्यात प्रवाशी मृत्युमुखी पडल्यास, अशा सर्व पीडितांना सारखा मोबदला दिला पाहिजे”.
भरपाईचा दावा ?
यात मृत व्यक्तीचे कायदेशीर वारस किंवा अवलंबित व्यक्ती भरपाईसाठी दावा दाखल करू शकतो आणि दुखापत झाल्यास स्वत: पीडित व्यक्ती करू शकतो.
मॉन्ट्रियल कन्व्हेन्शनच्या कलम ३३ नुसार पीडित व्यक्ती किंवा त्यांचा वारस एअर लाइनच्या मुख्य कार्यालय येथे भरपाईचा दावा करु शकतो.