जम्मूकाश्मीरच्या पोटनिवडणुकीने राजकीय समीकरणे बदलणार

- सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमध्ये बिघाडी

    18-Jun-2025
Total Views |

Jammu and Kashmir elections will change the political equation
 
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील पोटनिवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीमध्ये बिघाडी दृश्य स्वरुपात दिसत आहे. नागरोटा येथील पोटनिवडणूक लढवण्याबाबत दोन्ही मित्रपक्ष ठाम आहेत. त्याचवेळी भाजपही समीकरणांवर लक्ष ठेवून आहे.
 
अमरनाथ यात्रेनंतर निवडणूक आयोग नागरोटा आणि बडगाममध्ये पोटनिवडणुका घेऊ शकते. या दोन्ही जागा रिक्त झाल्यापासून सहा महिने उलटले आहेत आणि विशेष परिस्थितीतच सहा महिन्यांनंतर कोणतीही जागा रिक्त ठेवता येते. ‘लोकप्रतिनिधी कायदा 1951’मध्ये सहा महिन्यांच्या कालावधीनंतर जागा रिक्त ठेवण्यासाठी दोन तरतुदी आहेत. यांपैकी पहिली तरतूद म्हणजे रिक्त जागेवरील प्रलंबित कालावधी एक वर्षापेक्षा कमी असेल तर आणि दुसरी म्हणजे निवडणूक आयोगाने राज्यातील परिस्थिती पाहता निवडणुका घेणे कठीण आहे असे ठरवले, तर ही जागा रिक्त ठेवता येते. सध्या दुसरी तरतूद लागू आहे.
 
सध्या सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सकडे स्वतःच्या 41 जागा आहेत. याशिवाय, सरकारला सहा काँग्रेस, सात अपक्ष आणि एका माकप आमदाराचा पाठिंबा आहे. एकूण संख्याबळ 55 होते. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत नागरोटाची जागा सोडण्यास तयार नाही. जर नॅशनल कॉन्फरन्सने या जागेवर पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा केला, तर काँग्रेस सरकारवर पाठिंबा काढून घेण्याचे दबावतंत्र वापरू शकते. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या अडचणी वाढण्याची फारशी शक्यता दिसत नाही. मात्र, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून नक्कीच केला जाऊ शकतो.
 
... तर भाजपला लाभ होऊ शकतो
 
“नागरोटा मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमधील संघर्षाचा थेट फायदा भाजपला होईल. भाजपने पोटनिवडणुकीबाबतचे आपले पत्तेही उघड केले आहेत. यावेळी भाजपने मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन आव्हान देण्याची तयारी केली आहे. भाजप बडगाम येथे आपला उमेदवार उभा करण्याची तयारी करत आहे. भाजप पोटनिवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे. नागरोटा हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असून तो पुन्हा भाजपकडे येईल,” असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष सत शर्मा यांनी व्यक्त केला आहे.