मुंबई : पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशिव या चार जिल्ह्यातील कांग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा गटाच्या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने महाविकास आघाडीला खिंडार पडले आहे. मंगळवार, १७ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वयक किरण पांडव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
यासोबतच राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर, विदिशा या जिल्ह्यांमधील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा प्रदेश सचिव सोनाली मारणे, नगरसेवक राहुल तुपेरे, शहर सरचिटणीस किरण मारणे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या मंगल पवार, गिरीष जैवळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती नगर परिषदेतील माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, माजी नगरसेवक सुधीर सातपुते, प्रमोद गेडाम, अनिता गेडाम, राजू सारंगधर, चंद्रकांत खारकर, शोभा पारखी, शीतल गेडाम, प्रतिभा सोनटक्के, आशा निबांळकर आणि प्रदीप वडाळकर या ११ माजी नगरसेवकांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. धाराशिव जिल्ह्यातील सोमनाथ गुट्टे, आप्पासाहेब बिराजदार, शंकर चव्हाण, नागनाथ कदम, इलाई शेख, शहाजी हाके यांनीसुद्धा आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
श्यामसिंह ठाकूर यांची राजस्थान राज्य समन्वयकपदी नियुक्ती!
यासोबतच करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्यामसिंह ठाकूर, उपाध्यक्ष धरमसिंह ठाकूर, राष्ट्रीय संघटक ठाकूर नेमसिंह सिसोदिया, मेवाड एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष जीवन सिंघवी यांनीही त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्यामसिंह ठाकूर यांची शिवसेना राजस्थान 'राज्य समन्वयक'पदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूरचे उबाठा उपराज्यप्रमुख शैलेंद्र बारी, विदिशा जिल्हाप्रमुख विजेंद्र लोधी, जबलपूर जिल्हाप्रमुख सुजित पटेल, नगरप्रमुख मुकेश सारठे, इंदोरमधील जावेद खान, अभिषेक कालरा, सुरेश गुर्जर, राजीव चतुर्वेदी यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक आज मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करत आहेत. दिलेला शब्द पाळणे आणि जनतेच्या कामांना प्राधान्य देण्याचे काम शिवसेना करत आहे. काम करणाऱ्या लोकांना शिवसेनेवर विश्वास वाटतो, त्यामुळे दररोज विविध पक्षांचे अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याच विश्वासाच्या बळावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वांनी तयारीला लागावे," असे आवाहन त्यांनी केले.