विरार-अलिबाग मार्गिका ‘बीओटी’ तत्त्वावर उभारणार - ३७ हजार कोटींच्या खर्चाला मंजुरी; नऊ तालुक्यांना जोडणारा प्रकल्प गतीमान

17 Jun 2025 20:21:45



मुंबई : मुंबईला वेगवेगळ्या दिशांनी जोडणारा आणि वाहतुकीच्या समस्यांवर दीर्घकालीन उपाय ठरणारा ‘विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका’ प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची उभारणी बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर करण्यास मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

१२६ किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील ९६.४ किलोमीटरचा पहिला टप्पा नवघर (पालघर) ते बलावली (पेण) दरम्यान असणार आहे. या टप्प्यासाठी भूसंपादन आणि व्याजासाठी एकूण ३७,०१३ कोटी रुपयांच्या तरतुदीला मंत्रिमंडळाची हिरवी झेंडी मिळाली आहे. ही मार्गिका नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि राज्यातील अनेक महत्त्वाच्या महामार्गांशी थेट जोडली जाणार आहे. मुंबई-अहमदाबाद, मुंबई-पुणे, मुंबई-गोवा, मुंबई-बंगळूर, तसेच आग्रा आणि निर्मळ-कल्याण महामार्ग या सर्वांशी ही वाहतूक रेषा जोडली जाणार आहे.

वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या नऊ तालुक्यांतून ही मार्गिका जाणार आहे. त्यामुळे या भागांतील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून औद्योगिक विकासालाही नवे वळण मिळणार आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) या पद्धतीने प्रकल्प उभारण्यात येणार असल्यामुळे सरकारचा थेट खर्च कमी होणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यामुळे सार्वजनिक-खासगी भागीदारीला चालना मिळेल.

भूसंपादनासह आर्थिक तरतूद

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कामासाठी २२ हजार २५० कोटी रुपये तर, त्या रकमेवरील व्याजासाठी १४ हजार ७६३ कोटी रुपये अशी एकूण ३७ हजार १३ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद सरकारने मंजूर केली आहे.


इन्फो बॉक्स

  • एकूण लांबी : १२६.०६ किमी
  • पहिला टप्पा : नवघर ते बलावली (९६.४१ किमी)
  • पद्धत : बीओटी – बांधा, वापरा व हस्तांतरित करा
  • एकूण खर्च : ३७,०१३ कोटी
  • महत्त्वाचे जंक्शन : जेएनपीटी, नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स हार्बर लिंक
  • जोडले जाणारे मार्ग : मुंबई-पुणे, मुंबई-गोवा, मुंबई-अहमदाबाद इ.
  • जिल्हे/तालुके : वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण, अलिबाग

मुंबईतील मेट्रो मार्गांसाठी कर्ज घेण्यास मुदतवाढ

- मुंबईतील मेट्रो मार्ग-अ (दहिसर पूर्व ते डी.एन.नगर), ब (डी.एन.नगर ते मंडाळे) आणि मेट्रो मार्ग- (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) या प्रकल्पांकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक या वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

- एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून या तिन्ही मार्गिकांसाठी एकूण १ हजार ७५.७४ मिलीयन डॉलर कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी ५४९.२५ मिलीयन डॉलर म्हणजेच  हजार ३०४ कोटी ४३ लाख रूपये खर्च झाला आहे.

- या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने कर्ज उचल करण्यास दि. ३० जून, २०२५ पर्यंत मुदत दिली होती.  या प्रकल्पातील मेट्रो मार्ग-अ आणि  कार्यान्वित झाले आहेत. मेट्रो प्रकल्प ब चे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पात एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या कर्जाद्वारे ९६ मेट्रो ट्रेन घेण्यात येणार होत्या. त्यापैकी ६० मेट्रो ट्रेन प्राप्त झाल्या आहेत.  या कर्जास दि. ३१ डिसेंबर, २०२६ पर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे उर्वरित ३६ मेट्रो ट्रेन उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत. 


Powered By Sangraha 9.0