'सुंदर मी होणार'चा प्रयोग अचानक रद्द; अभिनेते अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा झटका! सविस्तर वाचा

17 Jun 2025 13:34:24


sunder me hoona experiment suddenly canceled actor amol bawdekar suffers heart attack

मुंबई : लोकप्रिय अभिनेते आणि गायक अमोल बावडेकर यांच्या प्रकृतीबाबत एक गंभीर बातमी समोर आली आहे. रविवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून तातडीने त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नुकतंच त्यांनी ‘सुंदर मी होणार’ या नाटकातून रंगभूमीवर पुनरागमन केलं होतं. अनेक वर्षांनंतर एका महत्वाच्या भूमिकेत ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र नाटकाच्या केवळ दुसऱ्याच प्रयोगाआधी अचानक प्रकृती खालवल्यामुळे रविवारचा प्रयोग रद्द करावा लागला.

हा प्रयोग मुंबईतील पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहात सकाळच्या सत्रात होणार होता. मात्र रविवारी सकाळी अमोल बावडेकर यांना त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याचे निदान केल्यानंतर तात्काळ अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाटकाच्या दिग्दर्शकांनी प्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांच्या तिकिटांचे पैसे परत करण्यात आले.

याआधी शनिवारी सायंकाळी वाशी येथे ‘सुंदर मी होणार’चा प्रयोग पार पडला होता. त्या प्रयोगादरम्यान अमोल बावडेकर यांना थोडी अस्वस्थता जाणवत होती. तरीही त्यांनी नाटक पूर्ण करण्याचा निर्धार ठेवत संपूर्ण प्रयोग केला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची तब्येत आणखी खालावली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं.

दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितलं की, ''चेकअपनंतर डॉक्टरांनी गंभीर स्थिती असल्याचे लक्षात घेतल्यावर तात्काळ अँजिओग्राफी सुचवली. अमोल यांनी नाटकातलं काम अधिक महत्त्वाचं मानत डॉक्टरांना विनंती केली की प्रयोग करून यायचं आहे, पण डॉक्टरांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. अशा अवस्थेतही रंगभूमीप्रती त्यांचं असलेलं प्रेम आणि समर्पण खरंच उल्लेखनीय आहे."

सध्या अमोल बावडेकर विश्रांती घेत असून, त्यांच्या भूमिकेसाठी आता अभिनेता अनिरुद्ध जोशी यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच ते तालमीला सुरुवात करणार असून पुढील प्रयोगांमध्ये ते रंगमंचावर झळकणार आहेत, अशी माहिती दिग्दर्शकांनी दिली. प्रेक्षकांना थोडा हिरमोड झाला असला तरी अमोल बावडेकर यांच्या प्रकृतीसाठी साऱ्यांकडून सदिच्छा व्यक्त होत आहेत. 


Powered By Sangraha 9.0