राज ठाकरेंची भूमिका दररोज बदलणारी! त्यांना महायूतीत...; रामदास आठवलेंचे विधान

17 Jun 2025 10:31:21


सांगली : राज ठाकरेंची भूमिका ही दररोज बदलणारी आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन महायूतीचा फायदा होणार नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. सोमवार, १६ जून रोजी सांगलीतील जतमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

रामदास आठवले म्हणाले की, "लोकसभेच्या वेळी राज ठाकरे आमच्यासोबत आले होते. पण त्यावेळी त्यांचा फायदा झालेला नाही. विधानसभेत ते आमच्यासोबत नसतानाही आमच्या अनेक जागा निवडून आल्या आहेत. राज ठाकरेंची भूमिका ही दररोज बदलणारी आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन महायूतीचा फायदा होणार नाही. आम्ही आरपीआय तुमच्यासोबत असताना राज ठाकरेंची आवश्यकता काय? अशी माझी पूर्वीपासूनची भूमिका आहे. राज ठाकरेंची भूमिका अनेकदा स्वबळावर लढण्याची राहिलेली आहे. त्यामुळे ते आमच्यासोबत येतील असे अजिबात नाही. त्यांना महायूतीत घेऊ नये असे आजही माझे मत आहे," असे ते म्हणाले.

राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा! कुठे किती बरसणार? जाणून घ्या...

मुंबईत महायूतीचाच झेंडा फडकेल!

"उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी मुंबईत महायूती मजबूत आहे. मुंबई ही बहुभाषिक आहे. अनेक राज्यांतील लोक तिथे राहतात. दलितांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी त्यांना सत्ता मिळणे अशक्य आहे. यावेळी मुंबईत महायूतीचाच झेंडा फडकेल," असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला.




Powered By Sangraha 9.0