इराण अणूबॉम्ब बनवण्यावर ठाम! अण्वस्त्र करारातून बाहेर पडणार असल्याचा इशारा

17 Jun 2025 18:42:18

तेहरान(Nuclear Non-Proliferation Treaty): इराण-इस्त्रायल युध्द पार्श्वभुमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवार, दि. १६ जून रोजी अण्वस्त्र प्रसारबंदी करार (NPT) सोडण्याची घोषणा केली आहे. हा करार सोडण्यासाठी इराणी संसदेत एक विधेयक मांडले जाणार आहे, असे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सांगितले आहे.

राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान म्हणाले की, “इराणचा अण्वस्त्रे विकसित करण्याचा हेतू नाही परंतु सध्यस्थिती लक्ष्यात घेता अण्वस्त्रे विकसित करणे आणि त्यांचे संशोधन करणे हे आमचा अधिकार आहे. अण्वस्त्रांच्या प्रसारबंदी करार (NPT) हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे. ज्याचा उद्देश अण्वस्त्रे आणि संबंधित तंत्रज्ञानाचा प्रसार रोखणे, अण्वस्त्रांच्या शांततापूर्ण वापरात सहकार्याला प्रोत्साहन देणे आणि अण्वस्त्र निःशस्त्रीकरण आणि संपूर्ण जागतिक निःशस्त्रीकरणाचे ध्येय पुढे नेणे आहे.”

इस्रायल आणि इराणमध्ये दिवसाढवळ्या होणाऱ्या हल्ल्यांमुळे संघर्ष वाढत असताना आणि युद्धाचे सावट असताना इराणच्या विदेश मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. रविवार, दि. १५ जून रात्री ते सोमवार, दि. १६ जून पहाटे दरम्यान इस्रायल आणि इराणमध्ये संघर्ष सुरूच होता. युद्धबंदीसाठी सातत्याने आवाहन केले जात असतानाही क्षेपणास्त्र हल्ले सुरूच होते. इस्रायलने इराणच्या अण्वस्त्रांनजीकच्या रहिवाशांना तेथून दूर जाण्याचा इशारा दिला आहे. यामुळे इराणमध्ये भीतीचे वातावरण आहे.

२०१८पासून इराण अण्वस्त्र सज्जतेसाठी वेगाने काम करत आहे. जेव्हा अमेरिकेने इराणच्या युरेनियम तयार करण्याच्या क्षमतेवर मर्यादा घालण्याच्या करारातून माघार घेतली. तेव्हापासून जागतिक स्तरावर भीतीचे वातावरण निर्माण झाले. इराण आपल्या युरेनियम साठाचा उपयोग करून जगाला धोका निर्माण करू शकतो. इराण आपला अण्वस्त्र कार्यक्रम शांततापूर्ण असल्याचा दावा करतो, परंतु आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या प्रमुखांनी वारंवार इशारा दिला आहे की जर देशाने असे करायचे ठरवले तर त्यांच्याकडे अनेक अणुबॉम्ब बनतील आणि ते जगासोबतच इराणमध्ये मुबलक युरेनियम साठा असल्यामुळे तेथे पण धोका निर्माण होईल, अशी भिती आहे.



Powered By Sangraha 9.0